
बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला वादग्रस्त साधू आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने 31 मार्चपर्यंत वैद्यकीय कारणांसाठी सशर्त जामीन मंजूर केला आहे. जामीनाच्या काळात त्याने कणालाही भेटू नये, भक्त-अनुयायी यांची भेट घेऊ नये, तसेच प्रवचन किर्तन करू नये, अशा अटी जामीनासाठी त्याला घालण्यात आल्या होत्या. मात्र,आता जामिनावर असलेला आसाराम बापू इंदूर येथील आश्रमात पोहोचला असून तेथे तो अनुयायांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचे अनुयायीही त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आश्रमात जमत आहेत. त्याच्या प्रवचनाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या चर्चा होत आहेत.
आसाराम बापूचा प्रवचनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तो अनुयायांच्या भेटी घेत असल्याचे दिसते. तसेच तो प्रवचनही करत आहे. काही भक्त त्याची आरती ओवाळताना दिसत आहेत. त्याला वैद्यकीय कारणासाठी जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला काही अटी घातल्या होत्या. या व्हिडीओमुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असताना दिसत आहे.
न्यायालयाने आसाराम बापूला कुणाचीही भेट घेण्यास, अनुयायी, भक्त यांना भेटण्यास आणि प्रवचन देण्यास बंदी घातली होती. मात्र समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लोकांच्या भेटीगाठी घेऊन आणि प्रवचन देत आसाराम बापू न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंदूर येथील आश्रमाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.