
आसाराम बापूला गुजरात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने आसारामचा अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 86 वर्षीय आसाराम बापूला 2013 च्या बलात्कार प्रकरणात 2023 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. ज्यासाठी तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. आता गुजरात उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. आसाराम बापूने उच्च न्यायालयात सहा महिन्यांसाठी अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. त्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, डॉक्टरांनी आसाराम बापूला पंचकर्म थेरपी घेण्याचा सल्ला दिला आहे. ही 90 दिवसांची उपचारपद्धती आहे. त्याच्या वकीलांच्या युक्तिवादानंतर आसारामचा अंतरिम जामीन आणखी 3 महिन्यांसाठी वाढवला आहे.