
शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या ४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. या योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांना आजही पाण्यासाठी झगडावे लागत आहे. जलकुंभाचे काम, पाइपलाइन टाकण्याची कामे रखडली आहेत.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शहापूर उपविभागाच्या देखरेखीखाली सुरू आहेत, मात्र अधिकाऱ्यांची पूर्ण बेफिकिरी दिसून येत आहे.
या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी जबाबदार असलेले अभियंते साईटवर हजर राहत नसल्याने ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. प्राधिकरणाचे उपअभियंता केतन चौधरी यांनी ठेकेदाराला अभय दिल्याचा आरोप तक्रारदार प्रशांत गडगे आणि शिवाजी देशमुख यांनी केला आहे. योजनेसाठी ९ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता तर ३० जानेवारी २०२३ रोजी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला. नियमानुसार १८ महिन्यांत काम पूर्ण करून पुढील १२ महिने योजना सुरळीत चालवणे बंधनकारक होते. मात्र अद्याप ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही.
दोन दिवसांपूर्वी केलेला रस्ता खोदला
ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा आणखी एक प्रकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अवघ्या दोन दिवसांपूर्वी नव्याने बांधलेला रस्ता ठेकेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता खोदला. लाखो रुपयांचा सरकारी निधी वाया घालवून या रस्त्यावर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झाला असून मुख्य रस्त्यावर माती आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे.