साबणाच्या किमती वाढल्याने अंघोळ महागली

महागाईने आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता ऐन थंडीत हुडहुडी भरायला लावणारी बातमी आहे. महागाई वाढल्याने किचन बजेट कोलमडले असताना आता महागाई  बाथरूमपर्यंत पोहोचली आहे. तेल, पीठ, डाळी, भाजीपाला, फळे यांच्या पाठोपाठ आता साबणाच्या किमतीत वाढ झाली आहे.

अंघोळीच्या साबणाच्या किमतीत 8 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. साबण ज्यापासून तयार केला जातो त्या पाम तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे तेलाच्या दरवाढीचा खर्च भरून काढण्यासाठी साबणाच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. अनेक लिस्टेड कंपन्यांनी आपले मार्जिन वाचवण्यासाठी चालू तिमाहीत साबणाच्या किमतीत वाढ करण्याचे ठरवले आहे. देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने चहा आणि स्कीन क्लिंजर उत्पादनांच्या किंमतीत वाढ केलीय. यात डव्ह, लक्स, लाईफबॉय, लिरिल, पियर्स, रेक्सोना आदींच्या ब्रँड अंतर्गत साबणाचा समावेश आहे. आयात शुल्कात वाढ झाल्याने सप्टेंबरच्या माध्यमातून पाम तेलाच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.