दिवाळी जवळ आल्याने ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी तुफान गर्दी होत आहे. मात्र वाहतूक विभागाचे नियोजन फसल्यामुळे रेल्वे स्थानक परिसर, जांभळी नाका या भागात ट्रॅफिकचा जांगडगुत्ता होत आहे. जांभळी नाका, खारकर आळी आणि महागिरी या भागातून उलट्या बाजूने वाहनांची ये-जा सुरू असल्याने त्यात अधिकच भर पडत असून टीएमटी बसेस व अन्य खासगी वाहनांच्या रांगांमुळे नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत होत असलेल्या या वाहतूककोंडीचा ठाणेकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त ठाणेकर खरेदीसाठी घराबाहेर पडले असून गेल्या पाच दिवसांपासून खरेदीचा जोर वाढला आहे. मुख्य बाजारपेठेसह गोखले रोड, राममारुती रोड तसेच पूर्वेतील कोपरी मार्केटमध्ये कपडे, कंदील, पणत्या, रांगोळ्यांनी दुकाने सजली आहेत. मात्र दिवाळीत खरेदीसाठी दरवर्षी तुफान गर्दी होत असल्याची माहिती असूनदेखील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन न केल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहतुकीचा फटका बसत आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने फूटपाथवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने पादचाऱ्यांना भररस्त्यातून चालावे लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. जांभळी नाका, खारकर आळी आणि महागिरी या भागातून विरुद्ध बाजूने वाहनांची ये-जा सुरू झाली असल्याने व्यापारी आणि स्थानिकांना या प्रचंड वाहतूककोंडीचा फटका बसत आहे.
दिवाळी संपेपर्यंत वाहतूक बंद करा !
ऐन सणासुदीत बाजारपेठेत वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला आहे. नागरिकांना होणारा त्रास व त्यावर उपाययोजना करावी यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना निवेदन दिले आहे. दिवाळी संपेपर्यंत या भागातील वाहतूक बंद करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, विभागप्रमुख संजय भोई, विभाग संघटक राकेश जाधव, बिपीन गेहलोत, उपविभागप्रमुख गणेश मुणगेकर, दौलत तळेकर, सुशील भोईर, शाखाप्रमुख परेश कांबळे, आनंद मानकामे आदी उपस्थित होते.