
वारंवार दूरध्वनी करूनही 108 क्रमांकाची रुग्णवाहिका न आल्याने प्रसव वेदना सुरू झालेल्या गर्भवतीला चक्क मोटारसायकलला बांधलेल्या हातगाडीतून रुग्णालय गाठावे लागल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये समोर आली आहे. सुदैवाने वेळेत उपचार झाल्याने प्रकृती स्थिर असून बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात एका गर्भवती महिलेची फरफट झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत.
मूळची छत्तीसगडची असलेली ही महिला पनवेलमधील आसूडगाव येथे आपल्या कुटुंबासह राहते. डोंबारीचा खेळ करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला सोमवारी रात्री अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या. तिला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी तिचा पती भरत गौड यांनी माहितीतील एका आशा वर्करला फोन केला. त्यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी दिलेल्या एका नंबरवर गौड यांनी फोन केला, परंतु वारंवार दूरध्वनी करूनही रुग्णवाहिकेच्या चालकाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाइलाज झालेल्या गौड यांनी थेट मोटारसायकललाच हातगाडी बांधली आणि त्यावर पत्नीला बसवून आसूडगाव ते उपजिल्हा रुग्णालय असा जीवघेणा प्रवास केला. डॉक्टरांनी वेळेत या महिलेवर उपचार करत सुखरूप प्रसूती केली असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. जुलै महिन्यात ही महिला पनवेल येथे राहण्यास आली होती.
जिल्हा व्यवस्थापकाची सारवासारव
108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार समोर आल्यानंतर या रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन करणारे जिल्हा व्यवस्थापक जीवन काटकर यांनी सारवासारव करत वेळ मारून नेली आहे. ते म्हणाले, पनवेल तालुक्यासाठी 108 नंबरच्या तीन रुग्णवाहिका सेवेत आहेत. त्यातील एक रुग्णवाहिका राखीव असते. इतर दोनपैकी एक रुग्णवाहिका मुंबई येथे रवाना झाली होती, तर दुसरी रुग्णवाहिका नेहमीच्या ठिकाणी होती. त्या आम्ही मागवू शकत नव्हतो, असे सांगत हात वर केले. दरम्यान, या बेफिकिरीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भरत गौड यांनी केली आहे.