नोकरी मुंबईत… पण फक्त अमराठींसाठी; अंधेरीच्या आर्या गोल्ड कंपनीची मुजोरी

मुंबईत मराठी माणसाची गळचेपी अजूनही सुरू आहे. मुंबईतील नोकरी असूनही ती फक्त अमराठींनाच देणार अशी मुजोरी आज पुन्हा एकदा दिसून आली. अंधेरीच्या मरोळमधील आर्या गोल्ड कंपनीने आपल्या डायमंड फॅक्टरीमध्ये रिक्त जागेसाठी जाहिरात दिली आहे. त्या जागेसाठी केवळ अमराठी उमेदवारच अर्ज करू शकतात, असे त्यात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

नोकऱयांबाबत माहिती देणाऱया ‘इनडीड’ या वेबसाईटवर आर्या गोल्ड कंपनीने ही जाहिरात दिली आहे. कंपनीला मुंबईतील फॅक्टरीमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर भरायचा आहे. त्या जागेसाठी पात्रतेच्या विविध अटी देण्यात आल्या आहेत. पुरुष उमेदवार नॉन महाराष्ट्रीयन असावा अशी संतापजनक अटही घालण्यात आली आहे. यावरून प्रचंड संताप निर्माण झाला असून या पंपनीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

कंपनीवर गुन्हा दाखल करा – वडेट्टीवार

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. सरकारने या घटनेची तत्काळ दखल घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकरीमध्ये डावलणाऱया आर्या गोल्ड कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचं सरकार गुजरातची मुनिमगिरी करण्यासाठी आहे का? – सुषमा अंधारे

शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. “जमीन, वाहतूक, वीज, कच्चा माल या सगळय़ा गोष्टी मुंबई व महाराष्ट्रातील चालतील, परंतु महाराष्ट्रातला मराठी माणूस यांना चालणार नाही. आर्या गोल्ड कंपनीच्या जाहिरातीत नॉन महाराष्ट्रीयन अशी प्रमुख अट घालण्यात आली आहे. महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजरातची मुनिमगिरी करण्यासाठी आहे? असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

शिवसेनेच्या दणक्यानंतर कंपनीचा माफीनामा

आर्या गोल्ड कंपनी मराठी माणसाला नोकरीमध्ये डावलत असल्याचे समजताच शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या कंपनीवरच धडक दिली. मुंबईत व्यवसाय करता आणि मराठी माणसाला नोकरी नाकारता? तुम्हाला मराठी माणसाची अॅलर्जी आहे का, असा जाब यावेळी शिवसैनिकांनी कंपनीचा मालक बंटी रुपरेजा याला विचारला. त्यावर रुपरेजा याने अनावधानाने जाहिरातीमध्ये चूक झाली असून ती दुरुस्त केली असल्याचे सांगितले. तसेच मराठी माणसाच्या भावना दुखावण्याचा कंपनीचा कोणताही हेतू नाही, असा जाहीर माफीनामा लिहून दिला. पुन्हा असा प्रकार घडला तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी प्रमोद सावंत यांनी दिला.