शिवसेना आमची आई, तिच्यासाठी जगू आणि मरू – अरविंद सावंत

तुम्हाला शिवसेनेचे वेड कधी लागले, या प्रश्नावर शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले की, आमच्या गिरगावावर मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या धगधगत्या विचारांचा मोठा प्रभाव होता. शिवसेना ही आमची उद्धार करणारी आई आहे. तिच्याच साठी जगू आणि मरू, असे ते म्हणाले. निवडणूक आल्या गेल्या, जिंकलो, हरलो, सत्ता आली गेली तरीही आपण इथेच आहोत. शेतकऱ्यांसाठी गावागावांत, जिल्ह्याजिल्ह्यांत आहोत. कुठे आहोत, असं विचारलं की अभिमानाने सांगा इथंच आहोत, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

‘आम्ही इथेच’

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठीच्या संघर्षातून जन्म झालेल्या शिवसेनेने अनेक वादळांना तोंड दिले. जे सोडून गेले ते ढोंगी, बोगस होते. निष्ठावंत शिवसैनिक कायम संघटनेसोबतच राहिला. तो कधीही दबावाला बळी पडला नाही. आजही मशाल घेऊन तो लढा देत आहे. आमची शिवसेना जागेवरच आहे. सगळे इथेच आहेत. आम्ही जगू तर शिवसेनेसाठी आणि मरणारदेखील शिवसेनेसाठीच, असा निष्ठेचा जागर शिवसेना नेते अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी केला. निर्धार शिबिराच्या पहिल्या सत्रात ‘आम्ही इथेच’ या शीर्षकाखाली शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत लक्षवेधक ठरली. यातून त्यांनी शिवसैनिकांसमोर निष्ठेचा वस्तुपाठ मांडला.