मणिपूर, शेतकरी, बेरोजगार यांना सरकार न्याय देऊ शकत नाही तेव्हा वाईट वाटते; अरविंद सावंत यांचे संसदेत जबरदस्त भाषण

लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बुधवारी ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करणारे भाषण केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून खासदार अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. सावंत यांनी जबरदस्त भाषण करत सत्ताधारी पक्षावर आसूड ओढले. ‘मणिपूर, शेतकरी, बेरोजगार यांना सरकार न्याय देऊ शकत नाही तेव्हा वाईट वाटते”, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी पक्षांना लगावला.

”आपण दिलेल्या शब्दात जान आणि शान दोन्ही असायला हवी. दिलेली वचनपूर्ती पूर्ण व्हायला पाहिजे. संकट काळात सरकारकडून मदत मिळत नाही तेव्हा खूप वाईट वाटतं. स्वातंत्र समानता हे सगळं संविधानात दिलं आहे. आम्ही फक्त एक अपेक्षा करतोय. आम्हाला फक्त एकता हवी आहे द्वेष नकोय. आपण ज्या भिंती उभ्या करताय त्या तुटायला हव्यात. मणिपूरची घटना घडते तेव्हा एक अश्रूही येत नाही तेव्हा वाईट वाटतं, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांचे इतके मोठे आंदोलन झाले तेव्हा साध्या संवेदनाही व्यक्त होत नाही, तेव्हा वाईट वाटतं. बेरोजगार रस्त्यावर फिरतोय़ त्याला सरकार न्याय देऊ शकत त्यावेळी वाईट वाटतं. या वेळी या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन सदन चालायला हवे”, असे अरविंद सावंत म्हणाले.

”ओम बिर्लाजी आपण न्याय‍धीशासारख्या पदावर विराजमान झाले आहात. गेल्या वेळी तुम्ही अध्यक्ष असताना काही कायदे पास केले गेले. त्यात एक इलेक्शन कमिश्नरचा कायदा होता तो आम्हाला निलंबीत केलेले बनवला गेला. न्याय द्यायची प्रक्रीया जिथे होते, कायदा बनवणारे आपण आहोत. तेच कायदे बदलले जातात तेव्हाच संविधानाची गोष्ट येते. संविधानाच्या सुरक्षेसाठी इंडिया आघाडी बनली आहे. हे सदन चालायला हवे यात काही दुमत नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावे यासाठी हे सदन चालायला हवे. त्यामुळे आमचा आवाज तुमच्याकडे आल्यावर तुम्ही आम्हाला अनुमती द्याल. संविधानाची रक्षा करण्यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल, असे आवाहन अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना केले.