मिंधे सरकारच्या कृपाशीर्वादाने सत्ताधाऱयांना, धनाढय़ांना उन्माद; रविंद सावंत यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

राज्य सरकारच्या कृपाशीर्वादामुळे सध्या सत्ताधाऱयांना आणि धनाढय़ांना उन्माद चढला आहे. या उन्मादातूनच आपले कोण काय वाकडे करणार आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दारू पिऊन हिट अँड रनचे प्रकार घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या थराला गेली आहे याचे हे उदाहरण आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी मिंधे सरकार आणि भाजपवर केला आहे.

पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे वरळीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची भयंकर घटना घडली. भरधाव बीएमडब्ल्यूने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिलेचा मृत्यू तर तिचा पती जखमी झाला. दारूच्या नशेत बेदरकार ड्रायव्हिंग करणारा मिहीर शहा हा मिंधे गटाचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. त्याने गाडीखाली चिरडलेल्या महिलेला ‘सी लिंक’पर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर तो फरार झाला आहे. या घटनेवर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनीही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. ते म्हणाले, राज्य सरकार रोज आपल्या लॉण्ड्रीतून एकेकाला धुऊन काढत आहे. त्यामुळे काही लोकांना वाटत आहे की, आम्ही कसेही वागले तरी चालते. पोलीस ठाण्यात गोळी चालवणाऱया, जाहीरपणे हातपाय तोडेन म्हणणाऱया आमदाराचे कोणीही वाकडे करू शकले नाही. त्यामुळे अशाचा माज वाढला आहे. या माजाचे मूळ कारण आहे त्यांची लॉण्ड्री आणि आमचे कोणी काय वाकडे करणार आहे, यात आहे. पुणे प्रकरणात हेच घडले. पुण्यात त्या प्रकरणाची सारवासारव करताना तर थेट गृहमंत्रीच आले होते.

 

सरकार बदलणे हाच त्यावर एकमेव उपाय

लॉण्ड्रीवाल्यांकडून आपण कोणतीही अपेक्षा करू शकत नाही. त्यासाठी हे सरकार बदलणे हाच एकमेव उपाय आहे. ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना भाजपने पक्षात घेतले. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाही लॉण्ड्रीवाल्यांनी पक्षात घेतले. मग तुमचे पंतप्रधान खोटे बोलत होते, असा आरोप मी संसदेत केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एका मंत्र्यावर नुसता आरोप झाले तर त्या मंत्र्याला पक्षातून काढून टाकण्यात आले. पण त्याच माजी मंत्र्याला भाजपने पुन्हा मंत्री केले, असा संताप शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.