आमच्या महाराष्ट्राला लुटून नेताय, रोजगार देणार कुठे? अरविंद सावंत यांचा बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर हल्ला

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देशातील बेरोजगारीचे संसदेत जोरदार फटकेबाजी केली. केंद्र सरकार म्हणते बेरोजगारांना नोकऱ्या देणार, इंटर्नशिप देणार. पण कुठे देणार? 500 कंपन्या सांगता, मग त्या कोणत्या आहेत ते तरी सांगा? महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवलात, महाराष्ट्राला लुटून नेलात, मग मराठी तरुणांना रोजगार देणार तरी कुठे तुम्ही, असा संतप्त सवाल अरविंद सावंत यांनी लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारला केला.

अरविंद सावंत यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडले. महाराष्ट्रातील बेरोजगारीबद्दल बोलताना अरविंद सावंत यांनी वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअर बस, मेडिकल डिव्हाईस पार्क हे सर्व उद्योगधंदे गुजरातला पळवून नेणाऱ्या भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. हिंदुस्थान तरुणांचा देश आहे असे म्हणता आणि तरुणांनाच रोजगार देऊ शकत नाही? असा सवाल त्यांनी सरकारला केला. बेरोजगारांसाठी योजना आणल्याचा दावा केंद्र सरकारने अर्थसंकल्पावेळी केला. त्याचाही समाचार खासदार सावंत यांनी घेतला.

कंपन्या बंद झाल्याने हजारो कामगार बेकार

चेन्नईतील नोकिया कंपनी बंद केल्याने 40 हजार लोक एकाच वेळी बेकार झाले. ज्या कंपनीत 300 पेक्षा कमी कर्मचारी असतील त्या कंपन्या बंद करणारे कायदे सरकारने आणले आहेत. सरकारच्या अखत्यारीतील नेव्हल डॉकमध्ये 25 वर्षे कंत्राटी कामगार आहेत. अॅक्सिस बँकेत दहा वर्षे काम करूनही कर्मचाऱ्यांचा पगार वाढला नाही. हजारो कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. जेट एअरवेज, हयात रिजन्सी हॉटेलच्या कामगारांना ना पेन्शन, ना ग्रॅच्युइटी काहीच नाही, असे जळजळीत वास्तवही खासदार सावंत यांनी यावेळी मांडले.