दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात या वेळी तिसऱ्यांदा विजय मिळवत शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी हॅटट्रिक केली. त्यांनी तीन लाखांपेक्षा जास्त मते मिळवून मिंधे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला.
शिवडी गाडीअड्डा वेअरहाऊस येथे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी झाली. मतमोजणीच्या वीस फेऱयांमध्ये अरविंद सावंत यांना 3 लाख 95 हजार 655 इतकी मते मिळाली तर यामिनी जाधव यांना 3 लाख 42 हजार 982 मते मिळाली. सावंत यांना 52 हजार 673 इतके मताधिक्य मिळाले.
सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या फेरीमध्ये अरविंद सावंत तीन हजार मतांनी पिछाडीवर होते. परंतु नंतर त्यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम होती. दहाव्या फेरीअखेरपर्यंत त्यांनी 1 लाख 99 हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर पंधराव्या फेरीत त्यांनी 3 लाख मतांचा टप्पा पार केला. विसाव्या फेरीनंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
यामिनी जाधवांच्या भायखळ्यातूनच मिळाली अधिक मते
अरविंद सावंत यांना सर्वाधिक 86 हजार 883 मते यामिनी जाधव यांच्या भायखळा विधानसभा मतदारसंघातून मिळाली. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात 77 हजार 469, शिवडी – 76,053, वरळी – 64,844, कुलाबा – 48,913 तर मलबार हिल विधानसभा मतदारसंघात 39 हजार 573 मते मिळाली.