भाजपचे ‘सबका साथ, सबका विकास’ हे फक्त दोघांसाठीच, अरविंद सावंत यांचे मोदी-शहांवर टीकास्त्र

केंद्र सरकारमध्ये फक्त दोघेचे एकमेकांना विश्वासात घेऊन भाजपचा आणि स्वतःचा विकास करीत आहेत. बाकी इतरांचा विश्वासघात करीत आहेत, असे टीकास्त्र शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोडले.

नाशिक सिडकोतील सावता नगर येथे म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप होते. कामगार सेनेचे अध्यक्ष, उपनेते सुधाकर बडगुजर हे यावेळी उपस्थित होते. खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभारावर सडकून टीका केली. आज शनिवारी गृहमंत्री अमित शहा हे रायगडावर गेले हे आश्चर्य आहे. कारण यांना अजूनही छत्रपती शिवाजी महाराज कळलेलेच नाहीत, हे माझे ठाम मत असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. त्यांचे नाव घेणारे केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधारी मात्र जनतेचा विश्वासघात करीत आहेत.

आज हनुमान जन्मोत्सवाचा धागा पकडून ते म्हणाले की, पवनपुत्र हनुमान हा प्रभू श्रीरामाचा एकनिष्ठ भक्त होता. म्युनिसिपल कामगार सेनेचे सदस्यसुद्धा शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. शिवसेना ही नेहमीच कामगारांच्या पाठीशी उभी राहिली. 12 वर्षे सेवेतून दूर केलेल्या कर्मचाऱ्याला न्याय देऊन 30 लाख रुपयांचे निवृत्तीवेतन मिळवून देण्याचे काम हे या संघटनेने केले आहे.

नाशिकमधील म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे आदींची यावेळी भाषणे झाली. नानाजी पडवळ, संजय गांगुर्डे, किशोर कोठावळे, नंदू गवळी, सोमनाथ कासार, रावसाहेब रुपवते, अंबादास विधाते, तुषार डकोलीया, राजेंद्र मोरी, विष्णू दातीर, संजय गोसावी, रवींद्र येडेकर, विशाल घागरे, सुनील सोनावणे, प्रकाश कोलते, अर्थव गवारे, अमित मकवाना, राहुल सटोले, विकी सकट, पंकज लोंढे, अमूल बागुल, कमलाकर, मल्ले आदी यावेळी हजर होते.