Delhi assembly election 2025 – केजरीवाल यांचं सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र, मागितलं चार प्रश्नांचं उत्तर

गतवर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडाला होता. आता नववर्षातही काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यात राजधानी दिल्लीचाही समावेश असून फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येथे मतदान होण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये गेल्या 12 वर्षापासून आम आदमी पार्टीची सत्ता आहे. त्याआधी काँग्रेसने 15 वर्ष दिल्लीवर राज्य केले. मात्र केंद्रात सलग तीन वेळा सत्तेवर बसलेल्या भाजपला अद्याप दिल्ली दूरच आहे. दिल्लीत लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकूनही विधानसभेला भाजपची गाडी काही बहुमतापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे यंदा भाजपच्या मदतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरएसएस दिल्लीमध्ये छोट्या-मोठ्या बैठका, सभा घेणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवून काही प्रश्न विचारले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आरएसएस भाजपसाठी मते मागणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. हे सत्य आहे का? तत्पूर्वी लोकांना तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की, भाजपने यापूर्वी केलेल्या चुकीच्या कृत्यांचे आरएसएस समर्थन करते का? असा सवाल केजरीवाल यांनी सरसंघचालक भागवत यांना विचारला. यासोबत त्यांनी आणखी तीन प्रश्न विचारले आहेत.

पहिला प्रश्न – भाजपचे नेते खुलेआमपणए पैसे वाटून मते विकत घेत आहेत. आरएसएस या मत खरेदीचे समर्थन करते का?

दुसरा प्रश्न – गरीब, दलित, पूर्वेकडील राज्यातील आणि झोपडपट्टीवासियांची मते वगळण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही लोक गेल्या कित्येक वर्षापासून इथे राहतात. त्यांची मते वगळणे देशाच्या लोकशाही योग्य आहे असे आरएसएसला वाटते का?

तिसरा प्रश्न – भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे देशाची लोकशाही कमकूवत करत आहे, असे आपल्याला वाटत नाही का?

दरम्यान, याआधीही अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवले होते. मोदींच्या निवृत्तीपासून ते तपास यंत्रणांच्या गैरवापरावरून केजरीवाल यांनी सरसंघचालकांना पाच खणखणीत प्रश्न विचारले होते.

अरविंद केजरीवाल यांचे सरसंघचालकांना पत्र; विचारले 5 खणखणीत प्रश्न