अरविंद केजरीवाल यांचे सरसंघचालकांना पत्र; विचारले 5 खणखणीत प्रश्न

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. मोदींच्या निवृत्तीपासून ते तपास यंत्रणांच्या गैरवापरावरून त्यांनी सरसंघचालकांना पाच खणखणीत प्रश्न विचारले आहेत. हे पत्र राजकीय पक्षाचा नेता म्हणून नाही तर सामान्य नागरीक म्हणून लिहिले असे म्हणत मोहन भागवत याची उत्तरं देतील अशी आशा केजरीवाल यांनी व्यक्त केली.

देशातील परिस्थिती पाहून चिंता वाटत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशाला ज्या दिशेने घेऊन जात आहे ते संपूर्ण देशासाठी घातक आहे. असेच सुरू राहिले तर लोकशाही, देश संपून जाईल. पक्ष येतील आणि जातील, निवडणुकी येतील आणि जातील, नेतेही येतील आणि जातील, पण देश कायम राहील. या देशाचा तिरंगा आकाशात स्वाभिमानाने फडकत रहावा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्या संदर्भात माझ्या मनात असलेले प्रश्न तुमच्यासमोर मांडत आहे. माझा उद्देश फक्त लोकशाही वाचवणे आणि मजबूत करणे आहे, असेही केजरीवाल यांनी आपल्या पत्रात नमूद केले.

1. देशातील विविध पक्षाच्या नेत्यांना आमिषं दाखवून किंवा ईडी-सीबीआयच्या धमक्या देऊन त्यांचे पक्ष फोडले जात आहेत. इतर पक्षांची सरकारं पाडली जात आहेत. अशा प्रकारे निवडून आलेली सरकारे पाडणे देश आणि लोकशाहीसाठी योग्य आहे का? कोणत्याही अप्रामाणिक मार्गाने सत्ता मिळवणे, हे तुम्हाला, संघाला मान्य आहे का?

2. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी देशातील काही नेत्यांना जाहीर सभेतून भ्रष्ट म्हटले आणि काही दिवसांनी त्यांच्यासोबत भाजपने घरोबा केला. उदा. 28 जून 2023 रोजी मोदींनी जाहीर सभेत एका पक्षावर व त्यांच्या नेत्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. काही दिवसांनी तो पक्ष मोडून त्याच्यासोबत सरकार स्थापन केले. कालपर्यंत ज्या नेत्याला भ्रष्ट म्हटले जायचे त्याच नेत्याला उपमुख्यमंत्री करण्यात आले. इतर पक्षांच्या भ्रष्ट नेत्यांचा भाजपमध्ये समावेश झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. तुम्ही किंवा संघ कार्यकर्त्यांनी अशाच भाजपची कल्पना केली होती का? हे सगळं बघून तुम्हाला वेदना होत नाहीत का?

3. संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. भाजपचा भ्रमनिरास झाल्यास त्याला ताळ्यावर आणण्याची जबाबदारी संघाची आहे. या सगळ्या वाईट गोष्टी करण्यापासून पंतप्रधानांना तुम्ही कधी रोखले का?

4. भाजपला आता संघाची गरज नाही विधान जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केले होते. संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. पण मुलगा आता आईला डोळे वटारण्याएवढा मोठा झालाय का? नड्डा यांच्या विधानाने प्रत्येक संघ कार्यकर्ता दुखावला आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे की, त्यांच्या वक्तव्यामुळे तुमच्या मनाला काय वाटले?

5. तुम्ही सर्वांनी मिळून एक कायदा केला की भाजप नेते वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्त होतील. या कायद्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला आणि या कायद्यानुसार लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे भाजपचे अनेक शक्तिशाली नेते निवृत्त झाले. मात्र तो कायदा मोदींना लागू होणार नाही, असे अमित शहा म्हणतात. अडवाणी निवृत्त झाले तो कायदा आता मोदींना लागू होणार नाही हे तुम्हाला मान्य आहे का? कायदा सर्वांना समान असायला हवा ना?