अरविंद केजरीवाल दिल्लीतील मुख्यमंत्री निवास लवकरच सोडणार; केंद्राकडे निवासस्थानाची मागणी

आपच्या वरिष्ठ नेत्या आतिशी यांनी अधिकृतरित्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून शनिवारी पदभार स्विकारला. आता त्या लवकरच सिव्हिल लाइ्न्स येथील मुख्यमंत्री निवासामध्ये शिफ्ट होतील. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्याचे सरकारी निवासस्थान लवकरच सोडावे लागणार आहे.

आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सरकारी निवासाची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी निवडणुक आयोगाच्या नियमांचा हवाला देत दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची मागणी केंद्राकडे केली होती.

राघव चड्ढा म्हणाले की, आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रीय कार्यालय आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या राष्ट्रीय संयोजकाला सरकारी निवासस्थान दिले जाते. आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतो की, केजरीवाल यांना सरकारी निवास देण्यात यावे.

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री बनण्यापूर्वी गाझियाबादच्या कौशांबी येथे राहत होते. 2013 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर ते तिलक लेन येथील घरात शिफ्ट झाले. 2015 फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ते सिव्हिल लाइन्स परिसराच्या सिक्स फ्लॅग स्टाफ रोड येथील निवासात राहत होते.

केजरीवाल यांनी मुख्यमंत्री निवास सोडल्यानंतर त्यांना राहण्यासाठी कुठे आणि कोणते घर दिले जाईल याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही माहिती देण्अयात आलेली नाही. आता केजरीवाल 10 फिरोजशाह रोड येथे शिफ्ट होऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

कथित मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची 13 सप्टेंबरला तिहार तुरुंगातून सुटका झाली. दोन दिवसांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी 15 सप्टेंबर रोजी जाहीर केले होते. 17 सप्टेंबर रोजी त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता लवकरच ते मुख्यमंत्री निवासही सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे.