केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबोडकर यांचा अपमान केला. त्याबाबत देशभरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विरोधकांनीही याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. महामान डॉ. बाबासाहेबांच्या नावावर आक्षेप असेल तर सत्ता सोडा, असे त्यांनी भाजपला सुनावले आहे.
केजरीवाल म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. वंचित वर्गातील करोडो लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर देवच आहेत. आपणही बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. जेव्हा माझ्यासमोर आव्हान किंवा समस्या असतात, तेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आठवतो आणि मला मार्ग सापडतो. डॉ. आंबेडकरांची विचारधारा आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार आमचा पक्ष चालवण्यात येतो. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचा अपमान आम आदमी पार्टी अजिबात सहन करणार नाही. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच सत्तेत आला आहात, याचे भान ठेवा. तुम्हाला बाबासाहेबांच्या नावावर आक्षेप असेल तर तुमची सत्ता सोडा, असे केजरीवाल यांनी भाजपला सुनावले.
आमचा पक्ष आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालतो, असे केजरीवाल यांनी सांगितले. आपण आंबेडकरांसोबत आहोत की भाजपसोबत आहोत याचा विचार भाजप समर्थकांनी करण्याची गरज असल्याचे केजरीवाल म्हणाले. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना जनतेला सवाल आहे की, अमित शाह यांनी केलेल्या बाबासाहेबांच्या अपमानाचे तुम्ही समर्थन करता का? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
पंतप्रधान म्हणतात की काँग्रेसने बाबासाहेबांसोबत योग्य व्यवहार केला नाही. तुमच्या पक्षाला आणि तुमच्या गृहमंत्री बाबासाहेबांचा अपमान कसा करतात? काँग्रेसने बाबासाहेबांसोबत गैरवर्तन केले तर तुम्हीही तेच करणार का? गृहमंत्र्यांनी सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केल्यामुळे संपूर्ण देश संतप्त झाला आहे. आप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशाराही केडरीवाल यांनी दिला.