रेवडी पे चर्चा…! भाजपला घेरण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी लाँच केली नवी प्रचार मोहीम

राजधानी दिल्लीत एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आम आदमी पार्टीचे (AAP) नेते, समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात आज मोठी घोषणा केली. निवडणूक जवळ आली आहे आणि आजपासून संपूर्ण दिल्लीत आपण एक नवी प्रचार मोहीम लाँच करत आहोत. या मोहीमेचे नाव आहे ‘रेवडी पे चर्चा’, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.

दिल्लीत आम आदमी पार्टीकडून एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर ‘रेवडी पे चर्चा’ ही प्रचार मोहीम लाँच केली. यावेळी संजय सिंह, मनिष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी अरविंद केरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दिल्लीची निवडणूक तोंडावर आली आहे. आणि आजपासून आता संपूर्ण दिल्लीत आपण एक नवी प्रचार मोहीम लाँच करत आहोत. या प्रचार मोहीमेचे नाव आहे ‘रेवडी पे चर्चा’. संपूर्ण दिल्लीत प्रत्येक गल्ली, प्रत्येक मोहल्ल्यात आणि प्रत्येक सोसायटीत अशा मिळून 65,000 सभा घेतल्या जातील. छोट्या-छोट्या सभा घेतल्या जातील. या छोट्या-मोठ्या सभांमधून आपले कार्यकर्ते, पदाधिकारी जनतेत जातील आणि पत्रक वाटले जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत आपण खूप कामे केली आहेत. प्रामुख्याने सहा मुद्दे म्हणजेच सहा फुकटची रेवडी आपण दिल्लीच्या जनतेला दिल्या आहेत. पंतप्रधान अनेक सभांमधून आणि कित्येकवेळा बोलले आहेत की, केजरीवाल दिल्लीत फुकटात रेवडी देत आहे. ही फुकटातली रेवडी बंद करायला हवी. म्हणून आपल्याला दिल्लीच्या जनतेला सांगायचे आहे की, हो आम्ही तुम्हाला या सहा रेवडी फुकटात देतोय. पण भाजपा म्हणेतय ही फुकटातली रेवडी बंद झाली पाहिजे. यामुळे फुकटात दिल्या जाणाऱ्या या सहा रेवडी हव्या की नको? हे दिल्लीच्या जनतेने आम्हाला सांगावं, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.