कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर येत्या मंगळवारी 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या पीठाने ही सुनावणीची तारीख दिली आहे. ईडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी सुनावणीसाठी तयार राहावं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक सुरू आहे म्हणून अंतरिम जामिनावर विचार केला जाईल. पुढील सुनावणीवेळी अंतरिम जामिनासाठीच्या अटींबाबत ईडीने माहिती द्यावी. त्यानंतर अंतरिम जामीन द्यायचा किंवा नाही? यावर निर्णय घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
येत्या मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी घेतली जाईल. सुनावणी लांबली तर आम्ही अंतरिम जामिनावर विचार करू, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. केजरीवाल तुरुंगातून सरकारी फायलींवर स्वाक्षऱ्या करू शकतात का? याचंही उत्तर ईडीने तयार ठेवावं, मंगळवारी आम्ही याबाबत विचारू, असं न्यायमूर्ती खन्ना म्हणाले.
मनीष सिसोदिया यांना काहीसा दिलासा; आठवड्यातून एकदा आजारी पत्नीला भेटता येणार
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयांकडून दिलासा न मिळाल्याने अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.