आता देवच माझं रक्षण करेल! केजरीवाल शासकीय निवासस्थान सोडणार, सेवा-सुविधांचाही त्याग करणार

सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर आले. बाहेर येताच केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर आतिशी मारलेना यांच्याकडे दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी शासकीय निवासस्थान सोडण्याचाही निर्णय घेतला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्याला अनेक सेवा-सुविधा मिळतात. केजरीवाल यांनाही त्या सुविधा मिळाल्या. पण राजीनामा दिल्यानंतर त्यांनी या सेवा-सुविधांचा त्याग करणार असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री निवासस्थानही आठवडाभरात रिकामे करणार असल्याचे त्यांनी म्हटले, असेही संजय सिंह यांनी सांगितले. यावेळी सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली.

अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत. आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही त्यांना निवासस्थान सोडू नका अशी विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला आणि माझे रक्षण आता देवच करेल असे म्हटले. मी 6 महिने कुख्यात गुंडांसोबत तुरुंगात राहिलो, तिथेही देवाने माझे रक्षण केले आणि इथेही देवच रक्षण करेल, असे त्यांनी म्हटल्याचे सिंह यांनी सांगितले.

भाजपने गेल्या 2 वर्षात अरविंद केजरीवाल यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने त्यांना भ्रष्टाचारी म्हटले, त्यांच्या प्रामाणिकपणावर सवाल उपस्थित केले. दुसरा कुणी गेंड्याच्या कातडीचा नेता असता तर खुर्चीला चिकटून बसला असता. पण केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडले आणि आता त्यांनी निवासस्थानही रिकामे करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)