दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचे मोठे षड्यंत्र आखले जात आहे. यासाठी दिल्लीतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहा टक्के मतं कापण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. हजारो जिवंत मतदारांची नावे गायब करण्यात आली असून त्याचे पुरावे देत निवडणूक आयोग आणि भाजपच्या फिक्सिंगचा पर्दाफाश केला.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप दिल्लीत कशा प्रकारे विरोधी पक्षांची व्होट बँक असणाऱ्या ठिकाणी मतदानाचा टक्का घटवू पाहत आहे याबाबतचे पुरावेच केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. भाजप मतं कापण्यासाठी निवडणूक आयोगाकडे निवेदन देत आहे. भाजपच्या लेटरहेडवर पत्र देऊन मतदार यादीतून नावे काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. मतदारांच्या नावासंदर्भात आक्षेप नोंदविण्यासाठी देण्यात येणाऱ्या अर्जावर भाजप पदाधिकाऱ्यांच्या सह्या असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहा टक्के मतं कापण्याचा प्रयत्न
शाहदरा मतदारसंघात 86 हजार मतदार आहेत. येथून भाजपचा उमेदवार 5 हजार 294 मतांनी जिंकला होता. या मतदारसंघातील 11 हजार नावे कापण्यासाठी भाजपने अर्ज केला आहे. यातील बहुतांश मतदार हे आम आदमी पार्टीचे आहेत. अशाच प्रकारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहा टक्के मत कापण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.
निवडणूक आयोगाकडून लपवाछपवी
मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी भाजपने 11 हजार अर्ज दिले आहेत, पण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 487 अर्ज दिसत आहेत. याचा अर्थ भाजपचे अर्ज न दाखवता लपवाछपवी करून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले गेले आहेत, असे केजरीवाल म्हणाले.
महाराष्ट्र, हरयाणात नक्की गडबड
महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी नेमके काय झाले माहीत नाही. त्या ठिकाणी निश्चितच संशयास्पद काही तरी घडले असून नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. शाहदरात 86 हजार मतदार आहेत. येथून भाजपचा उमेदवार 5,294 मतांनी जिंकला होता. येथील 11 हजार नावे कापण्यासाठी भाजपने अर्ज केला आहे. यातील बहुतांश मतदार आपचे आहेत. सुनीलकुमार, रेणुका गुप्ता असे अनेक मतदार माध्यमांपुढे आले.