आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. केजरीवाल यांनी आपल्या पत्रात दावा केला आहे की, नवी दिल्ली विधानसभेत भाजप कार्यकर्त्यांकडून आप कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे आणि त्रास दिला जात आहे.
केजरीवाल यांनी निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात दिल्ली पोलिसांचीही तक्रार केली आहे. दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आप कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आणि बीएनएसएस 2023 च्या कलम 126 अंतर्गत निराधार आणि खोट्या आरोपांवर गुन्हा दाखल करण्यात आला, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.
केजरीवालांनी पत्रात काय लिहिलं?
मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहलेल्या पत्रात केजरीवाल म्हणाले आहेत की, निवडणुकीच्या दिवसाआधी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून आणि दिल्ली पोलिसांकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या आणि त्रासा दिला जात आहे, याबद्दल मी गंभीर चिंता व्यक्त करत आहे. काल आमचे ज्येष्ठ स्वयंसेवक चेतन यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले. टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये बीएनएसएस 2023 च्या कलम 126 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या आधारावर त्याच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत, मात्र त्यांनी असा कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांच्यावर असे आरोप लावण्यात आले आहेत, जे त्यांनी केलंच नाही. त्याला पोलीस अधिकाऱ्यांचा गंभीर शारीरिक अत्याचार सहन करावा लागला, ज्यात बेशुद्ध झाला आणि नंतर त्याला लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नंतर बराच संघर्ष केल्यानंतर त्याला संबंधित रिटर्न ऑफिसर/एसडीएम यांच्यासमोर हजर करण्यात आले. ज्यांनी त्याला या प्रकरणात जामीन मंजूर केला.