दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांसंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून आम आदमी पार्टीने हल्लाबोल केला आहे. रद्द केलेले तीन काळे कृषी कायदे केंद्र सरकार मागच्या दाराने पुन्हा लागू करण्याच्या तयारीत आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे अनेक दिवसांपासून धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या त्याच मागण्या आहेत ज्या केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी मान्य केल्या होत्या. या मागण्या अजूनही लागू झालेल्या नाहीत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिषी यांना पत्र लिहिले आहे. तुमचे सरकार शेतकऱ्यांबद्दल उदासिन आहे. आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारला शेतकऱ्यांबद्दल संवेदना नाहीत. 10 वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आहे. पण माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कायम शेतकऱ्यांना धोका दिला, असा आरोप शिवराज सिंह चौहान यांनी पत्रातून केला आहे.
पंजाब में किसान कई दिनों से धरने और अनिश्चित अनशन पर बैठे हैं। इनकी वही मांगे हैं जो केंद्र सरकार ने तीन साल पहले मान ली थी लेकिन अभी तक लागू नहीं की। बीजेपी सरकार अब अपने वादे से मुकर गई। बीजेपी सरकार किसानों से बात तक नहीं कर रही। उनसे बात तो करो। हमारे ही देश के किसान हैं।…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 2, 2025
शिवराज सिंह यांनी केलेल्या आरोपांना अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहिली आहे. भाजप सरकार आपल्या आश्वासनांपासून घुमजाव केले आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांशी साधी चर्चाही करत नाहीये. ते आपल्या देशाचे शेतकरी आहे, त्यांच्या बोलायला काय हरकत आहे. शेतकऱ्यांशीही बोलत नाहीये, भाजपला एवढा अहंकार का आहे? असा सवाल करत केजरीवाल यांनी टोला लगावला.
पंजाबमध्ये शेतकरी आमरण उपोषणावर बसले आहेत. परमेश्वर त्यांना सुखरूप ठेवो. पण त्यांना काही झालं तर त्याला भाजप जबाबदार असेल, असे केजरीवाल म्हणाले. जे तीन काळे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर मागे घेण्यात आले होते त्यांना ‘पॉलिसी’ म्हणत केंद्र सरकार मागच्या दाराने पुन्हा लागू करण्याच्या तयारीत आहे. विचार जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने या पॉलिसीची प्रत सर्व राज्यांना पाठवली आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.