केजरीवालांचा जामीन रोखला ही चिंतेची बाब, दीडशे वकिलांचे सरन्यायधीशांना पत्र

राऊज एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना जामीन दिल्यानंतर त्या आदेशाची प्रत वेबसाईटवर अपलोड होण्याआधीच ईडीने हायकोर्टात आव्हान दिले. तिथे तत्परतेने सुनावणी झाली व आदेशाला स्थगिती दिली गेली. भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात असे कधी झाले नाही, असे नमूद करत पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली.

– ईडीचे वकील हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांचे सख्खे भाऊ आहेत. हे लक्षात घेता केजरीवाल यांना जामीन मिळू नये यासाठी ईडीच्या वकिलांनी केलेल्या अपिलानंतर सुधीर कुमार जैन यांनी नैतिक दृष्टीने आणि खटला निःपक्षपातीपणे चालावा यासाठी या प्रकरणातून बाजूला होणे गरजेचे होते, याकडे लक्ष वेधत केजरीवालांचा जामीन रोखला ही चिंतेची बाब असल्याचे तब्बल 157 वकिलांनी म्हटले आहे. याप्रकरणी वकिलांनी आपल्या स्वाक्षरीनिशी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे.

न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांचे सख्खे बंधू अनुराग जैन हे ईडीची बाजू उच्च न्यायालयात मांडत आहेत. केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर अंतिम निर्णय होत नसून खटला लांबतच चालला आहे. जिल्हा न्यायाधीशांच्या एका कथित पत्राबद्दलही वकिलांनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्हा न्यायालयाच्या अखत्यारित येणाऱया न्यायालयांच्या सुट्टीकालीन न्यायमूर्तींनी सुट्टय़ांदरम्यान कोणत्याही प्रलंबित खटल्यांप्रकरणी अंतिम आदेश पारित करू नये असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही बाबच अभूतपूर्व असून त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाचा मुद्दा अतिशय गंभीर बनला असल्याचे वकिलांनी म्हटले आहे.

पत्र लिहिण्याचे नेमके कारण काय?
राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायमूर्तींनी 20 जून रोजी अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला होता; परंतु ईडीच्या अपिलानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली. या आदेशाचा हवाला देत तब्बल 157 वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे.