दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापत आहे. आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच काँग्रसही या निवडणुकीत असल्याने त्यांच्याकडूनही आप आणि भाजपवर आरोप करण्यात येत आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाचा दावा करत पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. येत्या काही दिवसांत माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे. या त्यांच्या खळबजनक दाव्यामुळे राजकारण तापले आहे.
या दाव्याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी आपण सांगितले होते की, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक केली जाईल आणि आपच्या काही नेत्यांवर छापे टाकले जातील. आता विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे की, लवकरच CBI मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकणार आहे. भाजपचा दिल्ली निवडणुकीत पराभव होत आहे. पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळेच अटक आणि छापे टाकले जातील. आजपर्यंत त्यांना आमच्या विरोधात काहीही सापडले नाही, यापुढेही त्यांना काही सापडणार नाही. आम आदमी पक्ष हा प्रामाणिक पक्ष आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
मैंने कुछ दिन पहले बोला था कि दिल्ली CM आतिशी जी को गिरफ्तार किया जाएगा और “आप” के कुछ नेताओं पर रेड होगी।
विश्वस्त सूत्रों के मुताबिक मनीष सिसोदिया जी के घर अगले कुछ दिनों में सीबीआई रेड होगी।
बीजेपी दिल्ली चुनाव हार रही है। ये गिरफ्तारियां और रेड उनकी बौखलाहट का नतीजा है।…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 6, 2025
आपल्याला माहिती मिळाली आहे की, आपच्या नेत्यांवर छापे टाकण्याचे आदेश CBI ला देण्यात आले आहेत. आपला निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठी भाजप डाव आखत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना खोट्या प्रकरणात अटक करण्याचा त्यांचा डाव आहे. तसेच माझ्यावर, मनीष सिसोदिया, संजय सिंह, सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्या घरावरही धाड टाकण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. हे सर्व आरोप आणि जबाबदारीने करत असल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.