दिल्लीतून भाजपचा सुपडा साफ होणार; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

नवीन वर्षात दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुका जवळ येत असल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आम आदमी पक्षाने भाजपवर जबरदस्त हल्लाबोल केला आहे. तसेच पक्षाने दिल्लीतील सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. निवडणुकीच्या गदारोळात दिल्लीच्या उपराज्यपालांनी आप सरकारच्या महिला सन्मान योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावर आपचे संयोजक आणि दिल्लीचे मजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच दिल्लीतून भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावाही अरविंद केडरीवाल यांनी केला आहे.

महिला सन्मान आणि संजीवनी योजनांना भाजपने आक्षेप घेतला आहे. दिल्लीत भाजपला 3-4 जागाही मिळणार नाहीत.दिल्लीतून भाजपचा सुपडा साफ होणार असल्याचे केजरीवाल म्हणाले. दिल्ली सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात 1,000 रुपये मासिक हप्तांसह मुख्यमंत्री महिला सन्मान योजना जाहीर केली होती. दिल्लीत ‘आप’ची सत्ता राहिल्यास ही रक्कम 2,100 रुपये केली जाईल, असे केजरीवाल म्हणाले होते. 2020 मध्ये दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने जबरदस्त कामगिरी केली होती. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 62 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ 8 जागा मिळाल्या होत्या.

दिल्लीत झालेल्या गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकल्या होत्या तर भाजपने 3 जागा जिंकल्या होत्या. 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. जनतेला सत्य माहिती आहे. जनतेच्या हितासाठीच्या अनेक योजनांमध्ये भाजप खोडा घालत आहे. त्यामुळे दिल्लीतील जनता भाजपचा सुपडा साफ करणारच, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.