दिल्लीत कथित मद्य घोटाळा झाला असेल तर त्याचा पैसा कुठे गेला? असा सवाल करीत लोकसभा निवडणुकीत मी प्रचार करू नये, असा भाजप नेत्यांनी कट रचला आहे. माझ्या अटकेसाठी ईडीवर भाजपने दबाव टाकला आहे, ईडीने मला पाठवलेले समन्स हे बेकायदेशीर आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि ईडीवर केला.
केजरीवाल यांनी सोशल मीडियावरून दिल्लीवासीयांशी संवाद साधला. ‘दारू घोटाळा’ हा शब्द तुम्ही गेल्या दोन वर्षांपासून अनेकदा ऐकला असेल. भाजपच्या अनेक यंत्रणांनी गेल्या दोन वर्षांत अनेक छापे टाकले आहेत. अनेकांना अटक केली आहे. मात्र आजपर्यंत एका रकमेचाही हेरफेर सापडला नाही. एक पैसाही सापडला नाही. भ्रष्टाचार झाला असता तर कोटय़वधी रुपये गेले कुठे? इतका पैसा हवेत गायब झाला का?, असा सवाल त्यांनी केला. भ्रष्टाचार झाला नाही, हेच सत्य आहे, असे त्यांनी नमूद केले.