केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडणे आणि विरोधी पक्षांचे सरकार पाडणे हे भाजपचे राजकारण संघाला मान्य आहे का, असा सवाल करत रविवारी आपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोंडीत पकडले. भाजपला संघ मातेसमान आहे, पण हा मुलगाच आता आईवर डोळे वटारायला लागला आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर पक्षातर्फे आयोजित ‘जनता की अदालत’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले. मी कलंकासह जगू शकत नाही. माझ्याविरोधात बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले म्हणून मी व्यथित होऊ राजीनामा दिला, असेही ते म्हणाले.
माझी लिटमस टेस्ट
मला सत्ता आणि खुर्चीचा लोभ नाही. मी पैसे कमावण्यासाठी राजकारणात आलो नाही. देशासाठी आलो, देशाचे राजकारण बदलायला आलो आहे. पुढची दिल्ली निवडणूक ही माझी लिटमस टेस्ट आहे. मी प्रामाणिक वाटत असेन तरच मतदान करा, असे केजरीवाल म्हणाले.
संघावर पाच प्रश्नांची क्षेपणास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दहशत बसवत आहेत. विरोधकांचे सरकार पाडत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे वाटत नाही का?
ज्या ज्या नेत्यांना मोदी आणि शहांनी भ्रष्टाचारी म्हणून घोषित केले होते, नंतर त्याच नेत्यांसाठी भाजपमध्ये पायघड्या घातल्या गेल्या. या प्रकारच्या गलिच्छ राजकारणाचे समर्थन संघ करतो का? तुम्ही कधी नरेंद्र मोदी यांना ते चुकीच्या मार्गावर चालले आहेत याबद्दल टोकले का? तुम्ही भाजपच्या कार्यशैलीवर समाधानी आहात का? भाजपाला आता संघाची गरज उरली नाही, असे विधान जेपी नड्डा यांनी केले होते. यामुळे संघाला दुःख वाटले नाही का? संघाच्या कार्यकर्त्यांना या विधानाबाबत काहीच कसे वाटले नाही?