>> अरुणा सरनाईक
अचानक भरदुपारी अथवा उन्हं उतरणीला लागता लागता अलगद कुठून तरी शीतल वारा वाहू लागतो. दूर रानावनात पडणारा पाऊस वातावरणातला गारवा आपल्यापर्यंत पोहचवतो. कधी रात्री काळय़ा ढगांतून चार दोन पावसाचे थेंब येतात. मातीचा गंध वातावरणात पसरवितात. अवचित जाग आली तर याचा आस्वाद घेता येतो. नाहीतर हा मृद्गंध तुमच्या जागं होण्याची वाट बघत हवेच्या झुळकीसोबत तरंगत राहतो आणि पहाटे पहाटे तुम्हाला जागं करतो. आता पाऊस येणार, तुम्हाला थंडावा देणार. जिवाची काहिली संपणार, असं अबोलपणे सांगणाऱया ज्येष्ठाचं हे समजावणं मोठं लोभसवाणं असतं. ते आपण फक्त समजावून घ्यायचं असतं, खरं ना!
पाथेय वैशाखाचा एकाकी प्रवास हा ज्येष्ठाला समर्पित होतो.जणू एखाद्या वडील भावाने हात पसरून प्रवासातून आलेल्या लहान भावाला प्रेमानं जवळ घ्यावं आणि त्याचं ओझं, त्याचे ताण स्वतत सामावून घ्यावे, तसा हा ज्येष्ठ! वैशाखाला आपलासा करणारा पुढील वाटचालीचा भार ज्येष्ठावर सोपवून वैशाख निवांत होतो. मग सुरू होतो तो उष्णतेचा, उन्हाचा महोत्सव! अक्षरश: महोत्सवच… किती नाना प्रकार उन्हाचे बघायला, अनुभवायला मिळतात. सूर्यनारायण आपल्याला देतो. नको नको होईपर्यंत. सकाळची कोवळी उन्हं अगदी थोडा वेळच असतात. क्षणातच ती उन्हाची कोवळीक सकाळी सकाळी प्रौढ होऊ लागतात. आणि मग सुरू होतो तो सृष्टीचा उष्णता सोसण्याचा सहनशीलपणा. झाडावरील हिरवा रंगदेखील डोळय़ांना शांतवत नाही. किती तरी प्रकारच्या हिरव्या छटा आपआपल्या परीनं मनाला डोळ्यांना सुखविण्याचा प्रयत्न करतात, परंतु कडक उन्हाचा मारा त्यांचा प्रयत्न हाणून पाडतो. आपली सावलीसुद्धा उष्ण असावी असं वाटू लागतं.
उष्मा टिपेला पोचतो. अंतिम चरण गाठतो आणि मग अनुभवाला येतो ज्येष्ठाचा समंजसपणा! अचानक भरदुपारी अथवा उन्हं उतरणीला लागता लागता अलगद कुठून तरी शीतल वारा वाहू लागतो. दूर रानावनात पडणारा पाऊस वातावरणातला गारवा आपल्यापर्यंत पोहचवतो. परीक्षेला उतरून पास झालेल्या मुलाचा आनंद जसा गगनात मावत नाही तसाच सतत उष्णतेचा मारा भोगून तप्त मनाला हा गारवा दिलासा देतो. निसर्ग मोठा जादूगार आहे. त्याच्या अंगी नाना कला, क्षणात उन्ह तर क्षणात ढगांचं झाकोळ, वीजबाईचं आाढमण. घटकेत उष्णता तर घटकेत शीतलता. तर कधी रुद्र रूप. मनाला भिववणारं. दुरस्थ जीवलगांच्या काळजीनं व्याकुळ करणारं आभाळातल्या देवाला साकडं घालायला लावणारं…
दुपार जेव्हा संध्याकाळमध्ये बदलत जाते तेव्हाचं दृश्य बघण्यासारखं असतं. पांढऱया शुभ्र आकाशात अचानकपणे नाना रंगाची उधळण सुरू होते. सकाळी लाल सोनेरी रंगात रंगायचे नाही असं ठरवून बसलेले आकाश त्याच्याही नकळत लाल-केशरी-पिवळय़ा रंगात नटायला लागते आणि साऱया धरणीवर पिवळय़ा सुंदर रंगाची बरसात होते. खाली रस्त्यावर फुलांचा सडा पडलेला असतो. सर्वत्र पिवळय़ा आल्दाददायक रंगाची पखरण पाहून खरंच असं वाटतं की हा पिवळा प्रकाश नव्हे, ही तर धरणीच्या, विश्वजननीच्या देहावर उमटलेली सुंदर कोवळी गर्भच्छाया आहे. मात्र कधी कडक उन्हाची सुरुवात असते तर कधी पांढुऱया ढगांनी अंधारून येते. या अंधारलेल्या सकाळी कोवळय़ा उन्हाच्या सोनेरी कडा क्वचित दिसतात. भरदुपारी मात्र उन्हाचा तडाखा विशेष जाणवतो. विशेषत: माध्यान्ही सूर्य डोक्यावर तळपत असतो. अशा वेळी बाहेर पडावं तर निरभ्र आकाश निळेभोर आणि पांढुऱया ढगांच्या पुंजक्यानी भरलेलं असतं काळय़ा ढगांच्या सावल्या रस्त्यावर दिसतात. आकाश मात्र निरभ्र असतं. आणि हीच दुपार जेव्हा संध्याकाळमध्ये परावर्तित होते तेव्हा शाळेतल्या कडक बाई सुट्टीवर गेल्यावर मुलांनी वर्गात मनसोक्त धिंगाणा करावा तसे सारे रंग सूर्य उतरणीला लागल्यावर आकाशात अवतरतात आणि मग खुलते ती सांज. सारा निसर्ग निरनिराळय़ा रंगाच्या रंगोत्सवात विरून जातो.
फुलून येते सांज, रंगाची बाधा होते!
निळय़ा निळय़ा कृष्णासाठी, सारी सृष्टी राधा होते.
अशी अवस्था केवळ निसर्गाची नाही, तर आपलीसुद्धा होते. हे वातावरण इतके तरल आणि अलवार होते की हातातले काम टाकून आकाशातला हा रंगोत्सव न्याहाळत बसावं. बघता बघता मेघश्याम कृष्णाच्या सुरेल पाव्याचा स्वर कानी यावा तसा पाऊस येतो. निळा रंग पावसाच्या धारातून एकत्र होऊन आपल्यावर बरसत राहतो. तशी तलखी कमी हाऊ लागते. सोसलेले उन्हाळे, उष्ण वारे क्षणात शीतल करून टाकतात. एक नवजीवन प्रदान करून ज्येष्ठ आपला समंजसपणा दाखवितो. आजच्यासारखा प्रसंग उद्या घडेलच असं नाही. अशी खुलणारी रोज वाट बघायला लावते, पण रोजच येईल हे सांगता येत नाही. अवचित. येण्यातच तिची मजा असते, तिचा तोरा असतो आधी आगमनाची वर्दी नाही. फार काळ थांबत नाही. हातातले काम अर्धवट टाकून मला बघायला या, नाहीतर मी ही चालले. अशी नटखट सांज जीवाला वेडं करते. आपण त्याचबरोबर आपल्यात आपल्याही नकळत आपल्याला रंगवून टाकते. निसर्ग असाच आहे. स्वत:ला विसरायला लावणारा. आपल्या रंगात रंगवून रंगवणारा.
ज्येष्ठाचा आणखी एक गुण म्हणजे भारदस्तपणा हा होय. हा त्याचा भारदस्तपणा वाढवतात ते पांढरे पांढरे शुभ्र ढग. रात्री एकत्र जमा होतात. विशाल होऊन आकाशाला गवसणी घालतात. रात्रीचा काळोख कमी करण्याचं त्याचे सामर्थ्य चंद्रप्रकाशापेक्षा मोठे असते. हे पांढरे ढग रात्री चमकतात. आकाशाचा उजाळा ठरतात. झाडांची पानंन् पानं चमकून जातात. विशेषत: निलगिरी. पिंपळाची कोवळी लालसर पानं दृसारी सृष्टी, सारे जीव प्राणीमात्र निद्रेsच्या कुशीत विसावल्यावर हे पांढरे मेघमंडल जागता पहारा ठेवून आपलं काम करण्यात मग्न असतं. गडगडाट नाही, विजांचा चमचमाट नाही. कधीतरी अधल्या मधल्या काळय़ा ढगांतून चार दोन पावसाचं थेंब येतात. मातीचा गंध वातावरणात पसरवितात. अवचित जाग आली तर याचा आस्वाद घेता येतो. नाहीतर हा मृद्गंध तुमच्या जागं होण्याची वाट बघत हवेच्या झुळकीसोबत तरंगत राहतो आणि पहाटे पहाटे तुम्हाला जागं करतो. आता पाऊस येणार, तुम्हाला थंडावा देणार. जिवाची काहिली संपणार. असं अबोलपणे सांगणाऱया ज्येष्ठाचं हे समजावणं मोठं लोभसवाणं असतं. ते आपण फक्त समजावून घ्यायचं असतं, खरं ना!