
अरुण क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेच्या कुमार गटात शिवमुद्रा संघाने बाजी मारली तर ‘ब’ गटात अष्टविनायक संघाने आदर्श संघाचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली.
पै. विजय गोपाळ तोंडवळकर नगरीत खेळल्या गेलेल्या कुमार गटाच्या अंतिम सामन्यात शिवमुद्रा प्रतिष्ठानने नवोदित संघाला 40-25 अशी 15 गुणांनी धूळ चारली. विजयी संघाकडून चढाईत विशाल लाड याने, तर पकडीत अर्णव, राकेश धामी, आर्यन प्रधान, श्रेयस कांबळे चमकले. पराभूत संघाकडून चढाईत अर्जुन कोकरे, अथर्व सुवर्णा, तर पकडीमध्ये ऋषिकेश माळवी, रजत मुलानी यांचे प्रयत्न संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कुमार गटात स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट चढाईपटू’ म्हणून अर्जुन कोकरे, ‘सर्वोत्कृष्ट पकडपटू’ म्हणून अथर्व सुवर्णा, ‘सर्वोकृष्ट खेळाडू’ म्हणून विशाल लाड यांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
‘ब’ गटाच्या अंतिम लढतीत अष्टविनायक क्रीडा मंडळाने आदर्श संघाला 38-31 असे 7 गुणांनी पराभूत करत अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला. अष्टविनायक संघाकडून चढाईमध्ये निखिल पवार, विनय पवार यांनी, तर पकडीमध्ये साहिल पडवळ, आर्य सुळे यांनी चमकदार खेळ केला. पराभूत संघाकडून चढाईमध्ये ओमकार वाडकर, सुशील वाडकर यांनी, तर पकडीमध्ये करण ठाकूर, भीमकार गोयकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आपल्या संघाचा पराभव ते टाळू शकले नाहीत. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस निशिकांत शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
नुकतेच कांदिवली गावठाण येथे शिवसेनेच्या चारकोप विधानसभेच्या वतीने सुनील मन्वाचार्य चषक स्पर्धेचे विधानसभा निरीक्षक अशोक कासवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष सुनील मन्वाचार्य,, नरेंद्र मन्वाचार्य, अमित मन्वाचार्य, प्रभोद सावला, किशोर केणी उपस्थित होते.