दखल- आधारस्तंभांचा परिचय

>> अरुण नवले

भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोन आधारस्तंभ सत्तेचा व शासनाचा सर्व डोलारा सांभाळत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकसनशील राहून एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचला आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताने संसदीय कार्यपद्धतीचा स्वीकार केला. राष्ट्रपती व पंतप्रधान ही देशाच्या लोकशाही व प्रशासकीय कार्यप्रणालीतील दोन सर्वेच्च पदे आहेत. आतापर्यंत ज्या व्यक्तींनी ही पदे भूषविली त्यांच्या जीवनाचा थोडक्यात परामर्श ‘भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. घटनात्मकदृष्टय़ा आत्यंतिक महत्त्वपूर्ण असलेल्या या पदावर आजपर्यंत चौदा राष्ट्रपती आणि चौदा पंतप्रधानांनी उत्तुंग कार्य केले आहे. त्यांचे कार्य अतुलनीय, न भूतो न भविष्यती आहे. देशाच्या हिताचे, दूरगामी बदल घडवून आणणारे निर्णय घेण्याचे सामर्थ्य असलेली ही पदे अत्यंत महत्त्वाची आणि अनन्यसाधारण आहेत. प्रस्तुत पुस्तक हे दोन भागांत विभागले असून पहिल्या भागात आजमितीपर्यंत देशाच्या सर्वेच्च राष्ट्रपती पदावर ज्या दिग्गज व्यक्तींनी कार्य केले आहे असे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादपासून ते ‘भारताचे मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंदपर्यंतच्या सर्व मान्यवरांचा समावेश केलेला आहे. दुसऱया भागात स्वतंत्र भारताचे आणि आधुनिक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते आजघडीला दुसऱयांदा पंतप्रधान पद भूषविणारे नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा समावेश आहे.

थोडक्यात भारताचे आजपर्यंतचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा त्याग, सेवाभाव, देशभक्ती, निर्णय क्षमता, देशासाठी समर्पित जीवन चरित्राचा संक्षिप्त आढावा प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे. हा ग्रंथ अतिशय सुबक आणि मनोवेधक आहे.

भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान
लेखक ः राजेंद्रकुमार
अनुवाद ः प्रतिभा हंप्रस
प्रकाशक ः साकेत प्रकाशन प्रा.लि., छत्रपती संभाजीनगर
पृष्ठ संख्या ः 256
किंमत ः 300 रु.