परीक्षण- भानावर आणणारी कविता

>> सविता कुरुंदवाडे

प्रसिद्ध, संवेदनशील व समाजभान असलेल्या कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा नवा वेगळ्या आशयाचा काव्यसंग्रह ‘शाबूत राहो हे लव्हाळे’ नुकताच प्रकाशित झाला.

कवी जगतो त्याच्या भोवतालासकट

चांगलंवाईट, उचितअनुचित

पापपुण्यांची सांगड घालतो…’

या काव्यसंग्रहातील ‘कवी’ या कवितेत अंजलीताई म्हणतात. आपल्या सगळ्यांनाच भोवतालच्या परिस्थितीने निर्माण झालेले परिणाम स्वीकारावेच लागतात. पण कवयित्री या परिस्थितीच्या मूळ कारणांचा आरसा आपल्यासमोर दाखवते. अशा वेळी तुकाराम महाराजांचा अभंग अंजलीताईंना दिलासादायक वाटतो.

नीच पण बरवे देवा। नसे कोणाचाही दावा ।।

महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहती ।।

नीचपण म्हणजे लहानपण, कोवळेपण असा अर्थ अभिप्रेत आहे. हे लहानपण मला आवडेल, कारण माझ्यावर कोणीही हुकूमत दाखवू शकणार नाही. महापुरात उन्मत्त वृक्ष कोसळून पडतील. मात्र माझ्यासारखे नम्र, संयमी आणि तत्त्वाने जगणारे लव्हाळे मात्र तग धरून राहतील असा या अभंगाचा अर्थ आहे.

सामान्य माणसातील कोवळे, संवेदनशील आणि मुख्यतः विवेकवादी विचारी मन म्हणजेच हे लव्हाळे. सामान्य माणसातील मानवता जपणारा, विश्वासू ठामपणा या लव्हाळ्यातून प्रतिबिंबित होतो. असे नाजूक, पण कणखर लव्हाळे जोपर्यंत शाबूत आहेत तोपर्यंत सहिष्णूतेने जगण्याची पूर्ण शक्यता शिल्लक राहते. मूलतत्त्ववादी, हिंसावादी, विकृत वृत्ती या सर्वांमुळे निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीचे उत्तर म्हणजेच महापुरातले हे शाबूत राहिलेले लव्हाळे असेल.  म्हणूनच कवयित्री ‘शाबूत राहो हे लव्हाळे’ असे मागणे आपल्या काव्यसंग्रहातून समाजाकडे मागत आहेत.

ना अत्र ना तत्र ना परत ना भूमी ना आकाश,

समन्वयाच्या वाळवंटात एकटेच भटकणारे,

भयावह घुसमटणारा अंधार सर्वत्र...

अशा समर्पक शब्दात वास्तवाचे भान आणून देतात. हा कवितासंग्रह साधारण तीन विभागांत वाटला गेला आहे. पहिला विभाग समाजभान जागवणाऱया, सामाजिक आशय असणाऱया वास्तववादी, सद्यस्थितीचा स्पष्ट आरसा दाखवणाऱया कवितांचा आहे. दुसरा विभाग स्त्राrच्या समाजातील स्थानाचा, तिच्या प्रश्नांचा, तिच्या आवाजाचा आहे. या कविता नुसत्याच प्रखर स्त्राrवादी नाहीत; तर त्या स्त्राr संवादी आहेत. तिसऱया विभागात कविताविषयक कविता आहेत, थोडे कवयित्रीचे स्वगत, कवितेकडून (पर्यायाने समाजाकडे उघडय़ा डोळ्यांनी बघणाऱया प्रत्येक संवेदनशील व्यक्तीकडून)असणाऱया अपेक्षा आव्हान या स्वरूपातील आहेत. हे तीनही विभाग वेगवेगळे असले तरीही तीनही विभागाचा मूळ आशय वेगळा नाही. सुसूत्रतेने बांधलेल्या कवितांचा हा एकजिनसी संग्रह आहे.

‘शरमेची शंभर शकले, विंडोतलं आकाश, मृतसमुद्र, लगदा, इमारती, जंजाळ जाळात, डाकीण, सातत्याच्या नदीतून, समजेचा क्षण… अशा एकाहून एक सरस 84 कवितांनी नटलेला हा काव्यसंग्रह समाजातील बऱयावाईट गोष्टींचा ऊहापोह करत, वाचकाच्या मनावर राज्य करतो. सध्याच्या अस्थिर, भयावह परिस्थितीकडे झुकणाऱया समाजातील माणसांनी नेमके काय करायला हवे, काय नाकारायला हवे आणि काय स्वीकारायला हवे तसेच काय जपायला हवे हे समजून घेण्यासाठी अंजली कुलकर्णी यांचा ‘शाबूत राहो हे लव्हाळे’ हा वाचायला हवा. सृजनसंवाद प्रकाशनची निर्मिती उत्तम असून पुस्तकाची मांडणी, मुखपृष्ठ, तसेच आतील रेखाटने संग्रहाच्या आशयला योग्य न्याय देणारी आहेत.

शाबूत राहो हे लव्हाळे

कवयित्री ः अंजली कुलकर्णी

पृष्ठे ः 128  मूल्य ः रुपये 250/-

प्रकाशक ः सृजनसंवाद प्रकाशन

मुखपृष्ठ ः पुराजित