>> वैष्णवी पुरंदरे
भारतातील शिक्षण क्षेत्रात एक क्रांतिकारक पाऊल टाकण्यात आले आहे. त्याची सुरुवात केरळमधील एका शाळेतून झाली आहे. या शाळेने एआय तंत्रज्ञानावर काम करणारी शिक्षिका नियुक्त केली आहे. या शिक्षिकेचे नाव आयरिस असे असून मेकरलॅब्ज एज्युटेक कंपनीच्या सहकार्याने विकसित केले आहे. आयरिस केरळमधील आणि संपूर्ण देशातील पहिलेच ह्युमनाईज्ड रोबोट आहे.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातही एआयचा समावेश अभ्यासक्रमात करण्याबद्दल सुचविले आहे. यानुसार आयसीएसई आणि सीबीएसई या माध्यमिक शिक्षण मंडळांनी नववी व दहावीच्या अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा समावेश केला आहे. या पार्श्वभूमीवर असे प्रश्न निर्माण होतात की, मानवी शिक्षकांऐवजी यांत्रिक शिक्षक हे अध्ययन आणि अध्यापनासाठी उपयुक्त ठरतील का? रोबोटिक शिक्षकांच्या वापरामुळे शिक्षणाच्या व्यवस्थेत काय परिणाम आणि बदल संभवतात ? अध्यापनासाठी हा बदल योग्य आहे का आणि शिक्षकांची या बदलत्या परिस्थितीत स्थिती काय असेल व भूमिका काय असावी? तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग बघता एक गोष्ट मान्य करणे आवश्यक आहे की, या पुढील काळात तंत्रज्ञानाची वाढ ही कदाचित यापेक्षाही वेगाने होऊ शकेल.