
सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (एआय) कॅमेऱ्यांची नजर असणार असून दोन्ही बाजूच्या तब्बल 52 ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून अतिवेगाने जाणाऱया वाहनांवर सक्षमपणे कारवाई करणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वेगाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई होणार असून दंड भरावा लागणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली अंतर्गत 52 ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 19 जुलैपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रडारतंत्राचा वापर करून महामार्गांवरून जाणाऱया वाहनांचा वेग मोजण्यात येत असून वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास अशा वाहनाना ई-चलान देण्यात येत आहे. मुंबई -पुणे महामार्गावर घाट परिसरामध्ये हलके मोटार वाहन (कार) यांची वेगमर्यादा 60 कि.मी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा 40 किमी प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलके मोटार वाहन (कार) यांची वेगमर्यादा 100 कि.मी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेगमर्यादा 80 कि.मी प्रतितास आहे.
या प्रणाली अंतर्गत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱया वाहनांना ई-चलान देण्यात येत आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार असून अतिवेगाने जाणाऱया वाहनधारकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वेगमर्यादेसह इतर नियमांचे उल्लंघन केल्यासदेखील कारवाई होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.