लेख – एआय मानसिकता

>> आरती पेंडसे

बदाम खाऊन बुद्धी वाढते असं म्हणता म्हणता प्रचंड मोठी वाढलेलीच कृत्रिम बुद्धी निर्माण करण्यापर्यंत आपली मजल गेली आहे. बदामाने नेमकी किती बुद्धी वाढते ते माहिती नाही, पण या अतिशय वाढलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेने मात्र माणसाला कॉम्प्लेक्स द्यायला सुरुवात केली आहे.

आज जीवनाचं असं एकही क्षेत्र राहिलेलं नाही की जिथं कृत्रिम बुद्धिमत्ता एआय नसेलच असं आपण म्हणू शकतो. आरोग्य, शिक्षण, विविध प्रकारची समाज माध्यमं या सगळ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेनं आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. तिची शिकण्याची अचाट क्षमता लक्षात घेता तिला खूप कमी वेळामध्ये खूप जास्त गोष्टी शिकवता येणं किंबहुना तिचं तिनं शिकणं घडतं आहे.

कोणत्याही वेळी उपलब्ध असणं, ठराविक माहितीच्या अनुभवावर ठराविक उत्तरं न कंटाळता देत रहाणं, तुम्ही पाहिलेली चित्रं, वाचलेले लेख, त्याला दिलेलं लाईक सर्व माध्यमातून तुमचं व्यक्तिमत्व एआय ओळखू शकते. तुम्हाला पुढील सूचना देणं किंवा विशिष्ट साईटकडे नेणं ही पुढची पायरी सहजच घडते. इथपर्यंत ठीक आहे, पण तुमच्या व्यक्तिमत्त्वातली कमकुवत बाजू ओळखून त्याच्यावर आघात करणं किंवा विशिष्ट प्रकारची चित्रं, लेख तुमच्यासमोर आणून तुमचं मत ठराविक प्रकारांनी बदलत नेणं हेही कृत्रिमबुद्धी करू शकते आहे हे मात्र भयावह आहे. एआयचे फायदे असले तरी त्याचा मानवी मनावर मात्र सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकच परिणाम जास्त होईल अशी भीती मानसशास्त्रज्ञांना वाटते आहे.
सध्या तरी माणसांमध्ये तणाव आणि दुःश्चिंता या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. न कंटाळतात तेच ते काम प्रचंड वेगानं करत राहण्याच्या एआयच्या क्षमतेमुळे आपल्या हातातलं काम निघून जाईल, अशी भीती अनेकांना वाटते आहे. त्याचा परिणाम म्हणजे कमी होणारा आत्मविश्वास आणि आयुष्याचा हरवणारा अर्थ. पुढे जाऊन एआयने सतत पाठवलेल्या माहितीमुळे वाढणारी भीती, निर्माण होणारा न्यूनगंड, या स्पर्धेत कमी पडायला नको म्हणून केलेलं अतिरेकी काम आणि त्यातून होणारा बर्नआऊट. परस्परसंबंधांवरही विपरीत परिणाम होईल असं जाणवतं आहे. मनुष्यसदृश, पण यांत्रिकच संवादामुळे माणसांची अन्य माणसांबरोबर बोलण्याची क्षमता कमी होत जाईल, असं संवादतज्ज्ञांना वाटतं. नैराश्याने किंवा एन्क्झायटीने त्रस्त माणसाला मेंटलहेल्थ अॅपमधला चॅटबॉट तात्काळ उत्तर देतो. तो तुमच्याशी बोलताना भावनिक शब्द वापरत असला तरी त्यात भावना नसतात ज्याची माणसाला जास्त गरज असते. सतत यांत्रिक संवादामुळे भावनिक कोरडेपणा निर्माण होऊ शकतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने तात्काळ आणि तयार उत्तर मिळवण्याची घातक सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते आहे. त्यामुळे विषयाचा खोलवर जाऊन अभ्यास करणं किंवा आपण आपली बुद्धी लावून काही नवीन विचार करणं ही क्षमता हे विद्यार्थी गमावून बसतील की काय असं वाटत आहे.

विचार करणं व तशी कृती करणं हे मेंदूचे प्राथमिक कर्तव्य, पण ते खूप थकवणारं असतं. थोडे शब्द दिल्यानंतर आपोआप लेख किंवा कवितासुद्धा लिहून तयार मिळणं याच्यानं सुरुवातीला आनंद झाला तरी नंतर मात्र ही सृजन आणि सर्जनशीलताच मेंदू गमावून बसेल. प्रत्येक गोष्टीसाठी तयार उत्तरांवर अवलंबून राहण्याची वृत्ती माणसाच्या प्रगतीसाठी अतिशय धोकादायक गोष्ट आहे. यातून वैचारिक परावलंबित्व वाढत जाईल. ज्या काळात ज्ञान हीच सत्ता आहे तिथे ज्ञानाची अचाट भूक असलेल्या राक्षसाहाती आपली सर्व सूत्र देणं हे मानवी समाजासाठी घातक आहे.

सद्यस्थितीमध्ये ज्या प्रकारे एआय वापरला जातो आहे त्यामुळे सर्वांच्या मानसिकतेमध्ये भीती, नैराश्य, चिंता, आळशीपणा, भावनिक कोरडेपणा, सामाजिक एकटेपणा असे नकारात्मकच परिणाम प्रामुख्याने तरल पातळीवर जाणवत आहेत. त्यामुळे एआय धोकादायक वाटतो आहे, पण जर माणसानं आपली तारतम्यबुद्धी जागृत ठेवली तर मात्र तो एआयला फक्त वापरून घेऊ शकेल आणि स्वतःच त्याचा मालक बनू शकेल. कारण त्याला काय शिकवायचं हे अजून तरी आपल्याच हातात आहे.
(लेखिका मानसतज्ज्ञ व समुपदेशक आहेत.