भटकंती – इंदूरचे स्वयंभू पंढरीनाथ मंदिर

>> वर्षा चोपडे

वैभवशाली इतिहासामुळे प्रसिद्ध असलेल्या इंदूरमधील विठोबाचे स्वयंभू मंदिर आषाढी एकादशीला गजबजून जाते. मल्हारराव होळकर द्वितीय यांच्या काळात बांधले गेलेले हे मंदिर इंदूरमधील महाराष्ट्रीय भाविकांचे मुख्य आराध्यदैवत आहे.

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. विठोबा शेतकरी, कष्टकरी, वारकरी लोकांचा देव. आता स्वरूप बदलले. पंढरीचा विठुराया विश्वप्रसिद्ध झाला आणि भक्तांच्या रांगा लागल्या. देशात इतर काही भागांत विठ्ठलाची मंदिरे आढळून येतात, पण मध्य प्रदेशातील इंदूरला विठोबाचे सुप्रसिद्ध स्वयंभू मंदिर आहे. आताचे इंदोर असलेले इंदूर आपल्या वैभवशाली इतिहासामुळे प्रसिद्ध आहे.

1818 मध्ये तिसऱया इंग्रज-मराठा युद्धादरम्यान होळकरांचा महिदपूरच्या लढाईत इंग्रजांकडून पराभव झाला. परिणामी राजधानी पुन्हा महेश्वरहून इंदूरला हलवण्यात आली. इंदूर येथे ब्रिटिश रेसिडेंटची स्थापना झाली. होळकरांनी इंदूरवर राज्य केले. इंदूरला ऐतिहासिक वारसा आहे. येथील विठ्ठल मंदिराला पंढरीनाथ मंदिर ओळखले जाते. नदीकिनारी असलेले हे मंदिर खूप भव्य नाही, पण आषाढी एकादशीला येथे विठ्ठलभक्तांची गर्दी बघायला मिळेल. हे मंदिर 1811 ते 1833 या काळात महाराज मल्हारराव होळकर द्वितीय यांच्या काळात बांधले गेले. यासंबंधी एक घडलेली सत्य घटना सांगितली जाते. जमीनदार श्री विसाजी व त्यांच्या पत्नी सीताबाई पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे दरवर्षी आषाढी एकादशीला ते वारीत सहभागी होण्यासाठी पंढरपूरला जात असत. हा त्यांचा नियम होता. त्यासाठी ते दरवर्षी पायी जाऊन पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजाअर्चा करत असत, पण होळकर काळात ते जमीनदार असल्यामुळे नेमके आषाढी वारीच्या वेळी कामामुळे त्यांना बासवाडा येथे जावे लागले. त्यामुळे त्यांचा नियम मोडला, ते दुःखी झाले. त्यांनी देवाकडे माफी मागितली.

देव भक्तीचा भुकेला असतो. त्याच रात्री भगवान पांडुरंग त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले, “तू येऊ शकला नाहीस तर काय, मी स्वत तुझ्याकडे आलो आहे. मी तुमच्या छावणीजवळच्या तलावात आहे, मला बाहेर काढा.” त्याच ठिकाणी उत्खननाचे काम केले असता तेथून देवाची अतिशय आकर्षक काळ्या पाषाणाची मूर्ती सापडली. जी इंदूरला आणून प्राचीन इंद्रेश्वर महादेव मंदिराजवळ आणि सरस्वती नदीच्या काठी लष्करी छावणीजवळ स्थापन करण्यात आली.

महाराजा यशवंत राव होळकर (द्वितीय) यांनी सध्याचे पंढरीनाथ मंदिर बांधले. हे मंदिर महाराष्ट्रीयन शैलीत बांधण्यात आले आहे. मंदिराचा घुमट गोलाकार असून तो चार खांबांवर उभा आहे. शिखराच्या कीर्तीमुखावर पितळी कलश बसवला आहे. मंदिराच्या गाभाऱयात भगवान पंढरीनाथाच्या मूर्तीबरोबरच रुक्मिणी आणि बालगोपाळ यांच्या लहान मूर्तीही बसविल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशजी कोरलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणेशाची आणि डावीकडे कार्तिकेयची मूर्ती आहे. सध्या हे मंदिर मध्य प्रदेश सरकारच्या ताब्यात आहे. दरवर्षी देवशयनी व देवउठनी एकादशीला येथे जत्रा भरते आणि पालखी काढली जाते. जुन्या इंदूरमध्ये पंढरीनाथ ठाण्याजवळ हे मंदिर असून आजूबाजूला इंदूरचा बाजार आहे. इंदूर पर्यटनस्थळ असल्यामुळे जगभरातून लोक मालवा परिसर बघायला येतात. येथील माहेश्वरी सिल्क साडी खूप प्रसिद्ध आहे.खाण्याचे शौकीन असणाऱयांसाठी इंदूरमधील खाऊगल्ली प्रसिद्ध आहे. इंदूरचे इतरही अनेक प्रेक्षणीय स्थळे बघायला गेलात तर या मंदिरास भेट देण्यास हरकत नाही.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)