कथा एका चवीची – ‘वरी’ नॉट

>>रश्मी वारंग

उपवासाच्या दिवशी छानसं काही खावं असं ठरवताना वरीचा विचार करीत असाल तर वरी हा पोटभरीचा पर्याय ठरतो. वरीच्या गरमागरम तांदळावर ताक आणि जोडीला बटाटय़ाची भाजी या तीन गोष्टी म्हणजे उपवासाच्या शुद्ध सात्त्विकतेची खात्रीच! आषाढीचा उपवास असो किंवा आजचा गुरुपौर्णिमेचा, ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशीच गत असते. मात्र या खाण्यातील अस्सल हिंदुस्थानी पर्याय म्हणजे वरी. या वरीची ही सात्त्विक गोष्ट.

उपवासाच्या दिवसाचं खाणं ही एक स्वतंत्र संस्कृती आहे. ‘उपवास’ या शब्दाचा अर्थ परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा केलेला प्रयत्न. त्यामुळे या सहवासात अडथळा आणणाऱया अनेक गोष्टींना नाकारणं इथे अभिप्रेत आहे, पण प्रत्यक्षात उलटं होतं. आषाढीचा उपवास असो किंवा आजचा गुरुपौर्णिमेचा, ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशीच गत असते. मात्र या खाण्यातील अस्सल हिंदुस्थानी पर्याय म्हणजे वरी. या वरीची ही सात्त्विक गोष्ट.

वरी, वरई किंवा भगर हे हिंदुस्थानी मातीतलं भरड धान्य किंवा तृणधान्य आहे. भरड धान्याला श्रीधान्य असंही म्हणतात. काही वर्षांपूर्वी हिंदुस्थान सरकारने मिलेट म्हणजेच तृणधान्यांचे वर्ष साजरं केलं तेव्हा कांग, कोदरी, कोदो, कुटकी, नाचणी, राळेप्रमाणेच वरीकडे लक्ष वेधलं गेलं. त्याआधी वरीचा तांदूळ म्हणजे फक्त उपवासाला उपयोगी असं समीकरण जुळलेलं होतं.

वरीचा भात, वरीचं थालिपीठ, खीर, उपवासाचे आप्पे, आंबट भगर, फोडणीची भगर, भगर डोसा, मोकळी भगर, वरीची भाकरी, वरीचं सूप असे अनेकविध पदार्थ करता येतात. वरीचं नातं उपवासाशी कसं जोडलं? वरी पचायला हलकी असते. हे धान्य पौष्टिक आणि सत्त्वयुक्त आहे. उपवासाला खाल्लेल्या साबुदाणा, बटाटय़ामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो, पण वरीमुळे तसं काही होण्याची भीती नसते. वरीत प्रथिने व फायबर यांचे प्रमाण जास्त असते. हे सगळं असूनही वरीचा समावेश आहारात न होण्याचं कारण काय, हा प्रश्न मनात आल्याखेरीज राहत नाही.

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंचवार्षिक योजना जाहीर करण्यात आली. यात गहू आणि तांदूळ या धान्यांना विलक्षण महत्त्व आलं. त्यामुळे भरड धान्यांचं उत्पादन मागे पडलं आणि आहारातून ही धान्यं हळूहळू नाहीशी झाली.

हिंदुस्थानसह चीन, नेपाळ, रशिया या देशांमध्ये वरीची लागवड होते. महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिह्यातील सातपुडा पर्वतरांगांतील आदिवासी पारंपरिक पीक म्हणून भगरीचे नियमित उत्पादन घेत असतात. तेथील आदिवासी भगरीला पादी, बर्टी आणि मोर असे म्हणतात. त्या भागात पांढरी मोर, मोठी मोर, काळी मोर असे भगरीचे पारंपरिक प्रकार प्रसिद्ध आहेत. इंग्रजीत वरीला स्मॉल मिलेट, गुजरातीत सामो, मोरियो आणि हिंदीत मोरधन, सवा का चावल असं म्हणतात .

सध्याच्या पिढीला वरी शिजवायची कशी याबद्दल काहीच माहिती नसल्याने वरीच्या पदार्थांना अधिकाधिक विस्मृतीत ढकललं गेलेलं दिसतं, पण साधारणपणे बघायला गेलं तर तिला शिजायला खूप पाणी लागते. सैलसर आसट करायची तर दसपट पाणी घालून शिजवावी लागते. उपम्यासारखी करायची तर पाचपट पाणी हवं. वरी मुळात कोरडी असते. त्यात दाण्याचे कूट घातले जाते. तरी पण त्यात स्निग्धता कमी असल्याने भरपूर तूप घालूनच वरी खावी.

उपवासाच्या दिवशी छानसं काही खावं असं ठरवताना वरीचा विचार करीत असाल तर वरी हा पोटभरीचा पर्याय ठरतो. वरीच्या गरमागरम तांदळावर ताक आणि जोडीला बटाटय़ाची भाजी या तीन गोष्टी म्हणजे उपवासाच्या शुद्ध सात्त्विकतेची खात्रीच!

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)