बोनजॉर पॅरिस – अतिथी लुटो भव:

>>मंगेश वरवडेकर

वेडीच माणसे इतिहास घडवतात. त्यांच्यात काहीही करण्याचं पॅशन असतं आणि तेच आपल्या ध्येयाच्या दिशेने सुसाट सुटतात. मला पॅरिसचं फार कौतुक आहेच. फॅशननगरी तिसऱ्यांदा आपलं ऑलिम्पिकचं पॅशन साकारतेय. तब्बल शतकानंतर त्यांना ही संधी लाभलीय.

पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात तर भन्नाट झालीय. उद्घाटनसाठी फ्रान्स सरकारने आणि आयोजकांनी सर्वस्व पणाला लावले. दिमाखदार आयोजनासाठी पाण्यासारखा खर्च केला गेला. किमान एक कोटी पर्यटक ऑलिम्पिकच्या निमित्ताने पॅरिस गाठणार असल्याचा सरकारी अंदाज आहे. सरकारी अंदाज किती खरा असतो, याची कल्पना नाही, पण त्यांनी पर्यटकांकडून पैसा लुटायला सुरुवात केलीय.

आपल्या हिंदुस्थानात पाहुण्यांना देवाचा दर्जा दिला जातो. आपण अतिथी देवो भवः म्हणतो. प्रत्यक्षात आपण तसे वागतो का? हा प्रश्न आहेच. पण पॅरिसमध्येही तोच प्रकार जाणवू लागलाय. टॅक्सीवाल्यापासून झालेली सुरुवात हॉटेलमध्येही कायम आहे. एअरपोर्टवरुन तुम्ही टॅक्सी पकडलात तर तुम्हाला दीडपट अधिक भाडे द्यावेच लागणार. म्हणजेच जिथे तुमचे 50 युरो (एक युरो म्हणजे 92 रुपये) भाडे होत असेल तर टॅक्सीवाल्यांचा मीटर 75 ते 80 युरोच्या घरात गेलेला असतो. तुम्ही पॅरिसच्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करत असाल तर प्रत्येकाला असाच अनुभव येतोय. कालपरवापर्यंत किमान भाडे अडीच युरो होते ते ऑलिम्पिकसाठी चार युरो करण्यात आलेय. या वाढीचा पर्यटकांबरोबर सामान्य नागरिकांनाही फटका बसतोय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॅरिसच्या सर्व सार्वजनिक वाहतुक यंत्रणेचा ज्यात मेट्रो ट्रेन, ट्राम आणि बस या तिन्ही वाहतुकाRचा समावेश आहे, याचा महिनाभराचा पास 86 युरोला मिळायचा, अजूनही मिळतो, पण तो आता पर्यटकांसाठी सात दिवसांचा करण्यात आला असून त्याचे भाडे 70 युरो इतके करण्यात वाढवण्यात आले आहे. म्हणजे एका महिन्यासाठी तुम्हाला 280 युरो भरावे लागतील. तीन आठवडय़ांसाठी 210 युरो. तुम्हाला या आकड्यांवरून अंदाज आलाच असेल की पॅरिसचा प्रवास आणि ऑलिम्पिक पर्यटकांसाठी किती लुटीचा प्रवास ठरणार आहे ते.

ही झाली वाहतूक. इथे खाद्यपदार्थ असो किंवा पाणी. प्रत्येक वस्तूची किंमत प्रत्येक दुकानात वेगळी असते. पावलोपावली बदलते. जे पाणी मी एका सुपर मार्केटमध्ये दीड युरोला घेतले तेच पाणी मला दुसऱ्या मार्केटमध्ये तीन युरोला मिळाले आणि आयफेल टॉवरजवळ तर त्याची किमत चक्क पाच युरो होती. नुसती पाण्याची किंमत ऐकूनच माझ्या तोंडचे पाणी पळाले. खाण्याच्या पदार्थांच्याही अशाच किमती दिसल्या. इथे एक केळं एक युरोला मिळते आणि सफरचंद एक युरोला एक किलो. किमतीचे स्टॅण्डर्ड असे काहीच नाहीय. किमती निश्चित नाहीय.

असो, हॉटेल बुकिंग तर आणखीनच भन्नाट. ऑलिम्पिकसाठी तुम्हाला कुठेही रुम मिळणार नाही, असेच बुकिंग अॅप सांगतेय. तुम्ही वेगवेगळय़ा ऑनलाईन बुकिंग अॅपवर हॉटेल बुकिंगसाठी जाल तर तुम्हाला हेच दिसेल. शेवटचा एकच रूम बाकी आहे. शेवटचे दोन रूम बाकी आहेत, पण प्रत्यक्षात असे चित्र नाही. ते उभे केले गेलेय. बहुधा पर्यटक ऑलिम्पिक सुरु होताच येणार असतील किंवा नंतरच्या तारखांसाठी त्यांनी हॉटेल बुकही करतील. पण आता जे चित्र रंगवले गेलेय, ते वेगळे आहे. ऑनलाईन तुम्हाला एका दिवसासाठी 100 युरो भाडे द्यावे लागतेय, तर प्रत्यक्ष त्या हॉटेलात गेलात तर तुम्हाला 100 नव्हे तर 110-120 युरो दर मोजावे लागतेय. म्हणे ऑनलाईन दर कमी असतात. हा प्रकारही डोक्यावरून गेला. भाडे कमी करण्याऐवजी ज्यादा घेण्याचा हॉटेलचा प्रकारही पटत नव्हता. असंख्य पर्यटकांना या बदलाची कल्पनाही नसेल. पण ऑलिम्पिकसाठी केलेला सारा खर्च पर्यटकांकडूनच वसूल करण्याचे टार्गेट फ्रेंच सरकारने ठेवले की काय, असा प्रश्न मनात कोलांटउडय़ा मारू लागलाय. दोन दिवसांत हे अनुभव माझ्या पदरी पडलेत. पुढील तीन आठवडय़ांत पर्यटकांच्या नशिबी काय-काय येणार आहे ते दैवच जाणे.