बोनजॉर पॅरिस – ऑलिम्पिकमध्ये स्वप्नांचे इंडिया हाऊस

>>मंगेश वरवडेकर

100 कोटींचा हिंदुस्थान जेव्हा हात हलवत ऑलिम्पिकमधून मायदेशी परतायचा तेव्हा अवघा हिंदुस्थान रडायचा आणि आपल्या खेळाडूंना शिव्या हासडायचा. पण गेल्या तीन दशकांत स्थिती बदललीय. हळूहळू का होईना, आपली पावले जागतिक खेळांच्या मैदानात दिसू लागलीत. तीन दशकांपूर्वीच हिंदुस्थानात क्रीडा संस्कृतीचा पाळणा हलला, पण लंडन ऑलिम्पिकमध्ये तो गुडघ्यांवर दुडुदुडु धावू लागला. एकेक टप्पा गाठत आता क्रीडा संस्कृतीला मिसरूड फुटतेय. कारण ऑलिम्पिक भूमीत प्रथमच हिंदुस्थानचेही घर उभे राहिलेय. रिलायन्स फाऊंडेशनने पुढाकार घेत पॅरिसनगरीत इंडिया हाऊस उभारलेय. ही आपल्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे.

ऑलिम्पिक नगरीत आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन, चीन, जपानसह बहुतांश युरोपियन देशांचीच घरे दिसायची, ज्यात त्या त्या देशांची संस्कृती जोपासली जायची. आपल्या देशवासीयांना एकत्र आणण्यासाठी हे घर खूप महत्त्वाचे काम करायचे.

आता आपणही ऑलिम्पिकमध्ये जोरजोरात पावले टाकू लागलोय. आपण आता पदकांच्या शर्यतीबरोबर यजमानपदाच्या शर्यतीतही धावू लागलोय. आता आपल्याला दोनपेक्षा अधिक सुवर्णपदकांची स्वप्नंही पडू लागलीत. हे स्वप्न खरं करण्याची ताकद आपल्या वीरांमध्ये दिसेतय. तसंच 2036 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठीही आपण मेहनत करतोय. आपलं ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न पाहून एक फ्रेंच- हिंदुस्थानी म्हणाला, ऑलिम्पिक आयोजन म्हणजे खाऊ वाटलं का? तुम्हाला एक सुवर्ण जिंकता येत नाही आणि आयोजनाची स्वप्नं बघताय? त्याचे शब्द टोचले,. पण ते सत्य आहे. ऑलिम्पिक आयोजनापासून आपण खूप मागे आहोत हे पॅरिस पाहिल्यानंतर मला पटलं. पण स्वप्नंही मोठीच पाहायची असतात. आज आम्ही मागे असलो तरी पुढच्या दहा वर्षांत आम्ही अमेरिकन-युरोपियन देशांच्या खांद्याला खांदा लावणार. मी विश्वासाने बोललो. त्या दिशेने इंडिया हाऊस हे आपले पहिले पाऊल आहे. आता आपण ऑलिम्पिक आयोजनाच्या घरात शिरलोय. घरही बनवलेय.

पॅरिसचे स्टेडियम पाहिल्यानंतर आपलं अस्तित्व नक्कीच जाणवतंय. आपल्या वीरांना प्रोत्साहन देण्यासाठी हिंदुस्थानी क्रीडाप्रेमी मोठय़ा संख्येने आलेत. खेळाडूंचा उत्साह वाढवताहेत. वातावरणही तापवत आहेत. फक्त पदक तालिकेतलं आपलं अस्तित्व दिसण्यासाठी खेळाडूंनी आपलं सर्वस्व पणाला लावावं. हम किसीसे कम नहीं हे पदकतालिकेत दिसायला हवं.

इंडिया हाऊसच्या निमित्ताने पॅरिसमध्ये असलेले हिंदुस्थानी एका मंचावर आलेत आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या सदस्या नीता अंबानी यांनी इंडिया हाऊससाठी घेतलेला पुढाकारही काwतुकास्पद आहे. फ्रेंचवासी हिंदुस्थानींना खेचून आणण्यासाठी त्यांनी इंडिया हाऊसमध्ये स्वदेशीचा नारा देताना स्वदेश उभारलाय. 117 खेळाडूंचे लक्ष्यवेधी कल्पवृक्ष रेखाटलेय. हिंदुस्थानी संगीतासह हिंदुस्थानच्या पारंपरिक पदार्थांचाही आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हिंदुस्थानी खेळाडूंच्या ऑलिम्पिक कामगिरीला यादगार करण्यासाठी भव्य स्क्रीन उभारून स्टेडियमसारखा माहौल तयार केला. सारं काही हिंदुस्थानी आहे. ऑलिम्पिक नगरी उभं राहिलेल्या इंडिया हाऊसच्या पायगुणाने आपल्या क्रीडापटूंची पावले मोठय़ा संख्येने पोडियमवर पडली तर आपल्या क्रीडा संस्कृतीला आणि ऑलिम्पिक यजमानपदाच्या स्वप्नांना गरुडाचे पंख लाभतील. मग पुढे काहीही अशक्य नसेल.