>>द्वारकानाथ संझगिरी
टी ट्वेंटी विश्व कप जिंकल्यानंतर राहुल द्रविडने थाटात हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक पद सोडलं. खुर्ची सोडतानासुद्धा टायमिंग साधायचं असतं. फलंदाजीतलं त्याचं टायमिंग त्याने इथे दाखवलं. देशासाठी फलंदाज म्हणून त्याने प्रचंड पराक्रम गाजवला. त्याच्या वाटेला आशा भोसलेंचंच नशीब आलं, लता मंगेशकरांचे नाही. अर्जुनाची भूमिका त्याला कधीही मिळाली नाही. पण यावेळी मात्र त्याने अर्जुनाप्रमाणे पक्ष्याचा डोळा अचूक पह्डला आणि विश्वचषक जिंकला. त्याची जागा आता गौतम गंभीरने घेतली आहे. मी राहुल द्रविडला जेवढा जवळून ओळखतो त्याच्या पाच टक्केसुद्धा गौतम गंभीरला जवळून ओळखत नाही. त्यामुळे माझ्यासाठी आणि जवळपास इतरांसाठीसुद्धा त्याची कारकीर्द बंद लिफाफा आहे.
या बंद पाकिटात नेमकं काय आहे हे सांगणं कठीण आहे. पण ज्यांना गौतम गंभीरचा स्वभाव, त्याची वृत्ती, त्याचा कणखरपणा आणि काही बाबतीतले त्याचे कठोर निर्णय पाहता त्यात यश नक्की असेल, पण प्रेमपत्र नक्कीच असणार नाही.
राहुल हा हिंदुस्थानी क्रिकेटमधला एक महान फलंदाज आहे. कदाचित इतिहासातल्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये तो येतो. गौतम गंभीर हा जिगरी फलंदाज होता. न्यूझीलंडमध्ये त्याने बाजीप्रभूच्या तडफेने फलंदाजी केली होती. पण सगळय़ात त्याचं महत्त्वाचं यश आहे टी-ट्वेंटी आणि वन डेच्या विश्वचषकातलं. 2007 साली टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकताना सर्वाधिक धावा त्याने केल्या होत्या आणि 2011 साली वन डेचा वर्ल्ड कप जिंकताना त्याचे शतक फक्त तीन धावांनी चुकलं होतं. दुर्दैवाने त्याचं व्हावं तेवढं कौतुक कधी झालं नाही ही बोच त्याला असेल का?
राहुल हा टप्प्याटप्प्याने प्रशिक्षक म्हणून हिंदुस्थानी संघाच्या पेंटहाऊसमधे चढला. आधी 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक. मग हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाचा प्रशिक्षक आणि शेवटी हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक. त्यामुळे हिंदुस्थानी संघातले सर्व खेळाडू त्याच्या नजरेखालून गेले होते. त्यांचा स्वभाव, त्यांच्या सवयी त्याला ठाऊक होत्या. गंभीरला थेट हेलिकॉप्टरने पेंटहाऊसवर उतरवलं आणि मुख्य म्हणजे ठरवून उतरवलं. त्याच्या स्पर्धेत डब्ल्यू. व्ही. रामनला उतरवणं हा केवळ उपचार होता. गंभीरकडे अर्थात केकेआरचं विजेतेपद आहे आणि तो आयपीएलमध्ये बराच काळ असल्याने तो या खेळाडूंना ओळखतो आणि त्याने त्यांना जवळून पाहिलं आहे. हिंदुस्थानी संघामध्ये मॅनेजमेंट फार महत्त्वाची असते. कारण शेवटी हिंदुस्थान हा एक उपखंड आहे. वेगवेगळय़ा प्रांतातले, वेगवेगळय़ा भाषेचे, वेगवेगळय़ा संस्कृतीतले खेळाडू एकत्र येतात. त्यांना एकजिनसी करणं हे तितपं सोपं नसतं. ते अजित वाडेकरला जमलं. ते अंशुमन गायकवाडला जमलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कर्स्टनला जमलं. रवी शास्त्री आणि राहुल द्रविडने संघाशी जुळवून घेतलं, पण ग्रेग चॅपेल आणि कुंबळे हे महान खेळाडू असूनसुद्धा त्यांना ते जमलं नाही. गंभीर हा खेळाडूंच्या कलाने घेणारा माणूस नाही. त्याचा चेहरा (छोट्या आठीसह) त्याच्या मनातल्या भावनांचा आरसा आहे आणि एखादा कठोर निर्णय घेताना तो पुढे-मागे पाहणार नाही.
सूर्याला टी-20 चा कर्णधार करायची सुरुवात जरी द्रविड असतानाच सुरू झाली तरी गंभीरने प्रशिक्षक झाल्यावर ताबडतोब तो निर्णय घेतला. कारण त्याला फिट कॅप्टन हवा होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे किमान श्रीलंकेमध्ये वन डे खेळतील हे त्याने पाहिलं. तो द्रविडपेक्षा अधिक नव्या काळातून आल्यामुळे आणि विशेषतः पांढऱया बॉलने खेळत असल्यामुळे काही नवीन संकल्पना, डावपेच तो लढवू शकतो. उदाहरणार्थ केकेआरसाठी त्याने वेस्ट इंडीजचा खेळाडू सुनील नरीनला थेट आघाडीचा फलंदाज बनवला. त्याला तशी तीन महिने प्रॅक्टिस करून ये असं सांगितलं आणि तो डावपेच प्रचंड यशस्वी झाला. अर्थात प्रत्येक पावलावर यश मिळतंच असं नाही, पण किंबहुना अपयशाच्या काळात तो कशी पावलं टाकतो हे महत्त्वाचं आहे. मी त्याला केवळ वयाचा आधार घेऊन ‘यशस्वी भव’ असा आशीर्वाद देतो आणि त्याचबरोबर एक छोटा सल्लासुद्धा देतो. त्याने आपलं गंभीर हे आडनाव फार गंभीरपणे न घेता गौतम हे नाव जास्त गंभीरपणे घ्यावं. तो गौतम बुद्ध होऊ शकला नाही. तरी त्याने दुर्वास मात्र होऊ नये.