अभिव्यक्ती – स्त्री संतांच्या रचनांचा मुक्त स्वर

>>डॉ. मुकुंद कुळे

वारकरी संतपरंपरेतील संत-कवयित्रींच्या रचना आणि त्यांचं आयुष्य पाहिलं की स्तिमित व्हायला होतं. या संतस्त्रिया केवळ स्त्रीमुक्तीचा नाही, तर मानवमुक्तीचा स्वर आळवतायत असं वाटतं. संत स्त्रियांच्या काव्यातील हाच मानवमुक्तीचा, कल्याणाचा स्वर गायिका-अभिनेत्री योजना शिवानंद यांना महत्त्वाचा वाटला असावा. गेली काही वर्षं त्या संतकवयित्रींच्या रचनांशी जोडून घेत ‘अभंगवाणी’चा कार्यक्रम सादर करतात. यावेळचा अभंगवाणीचा विषय होता- आदिशक्ती मुक्ताई! स्त्रीशक्तीच्या गौरवीकरणाला सादर करण्याचा हा त्यांचा प्रयत्न म्हणजे स्त्री-संतांच्या रचनांची अडलेली वाट आपल्या अभंगवाणीतून मोकळी करण्यासारखे आहे.

बाया मोठय़ा धीराच्या असतात. वेळप्रसंगी त्या हळव्या होतात, कोलमडतात, पण निसर्गत त्या पुरुषांपेक्षा अधिक कणखर, मजबूत असतात. वारकरी संप्रदायातल्या संत स्त्रियांकडे पाहिलं की, हे अधिकच प्रकर्षाने जाणवतं. जनाबाई काय, मुक्ताबाई काय, सोयराबाई काय किंवा विठाई-गोणाई-राजाई काय…सगळ्या जणींनी प्रपंचात राहून, घरीदारी काम करून विठ्ठलभक्ती केली. तीदेखील अशीतशी नाही. आपल्या भक्तीचं नाणं खणखणीत वाजवून. मात्र या साऱया जणी होऊन गेल्या त्या तेराव्या शतकात. वारकरी संप्रदायाच्या प्रारंभिक काळात. वारकरी संप्रदायाचा हा प्रारंभ काळ एका अर्थाने या पंथाचा सुवर्णकाळ होता. यादव राजांच्या राजवटीमुळे तत्कालीन महाराष्ट्र परिसरात एका अर्थाने सुबत्ता-शांतता नांदत होती. परिणामत त्या काळाचा म्हणून असलेला एक सकारात्मक अवकाश तत्कालीन संत परंपरेला लाभला आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात विठ्ठलभक्तांची एक मांदियाळीच उदयाला आली. मग ते पुरुष संत असो किंवा स्त्री संत.

मात्र वारकरी संप्रदायातल्या या संत परंपरेतही एक गंमत आहे. या परंपरेतले पुरुष संत मला अधिक भाबडे वाटतात. त्या मानाने संत स्त्रिया अधिक खंबीर-कणखर आणि वास्तवाची जाण असलेल्या दिसतात. जणू काही त्यांनाच खऱया अर्थाने व्यक्तिस्वातंत्र्याचा-स्त्री मुक्तीचा खरा आत्मस्वर गवसलेला असावा, नाही तो गवसलेलाच होता. अगदी संत जनाबाईपासून ते सोयराबाईपर्यंत आणि मुक्ताबाईपासून ते सतराव्या शतकातील बहेणाबाई शिऊरकरांपर्यंत आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्री मुक्तीची ही रेघ ठसठशीतपणे उमटलेली दिसते… अन्यथा संत जनाबाई कशी काय उच्चरवाने म्हणू शकली असती-
डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी
हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा,
आता मज मना कोण करी
पंढरीच्या वाटे मांडियले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही
जनी म्हणे देवा झाले मी येसवा, रिघाले केशवा घर तुझे
देवा तुझ्या नादापायी आता मी वेश्या झालेले आहे, असं म्हणण्याचं धाडस जनाबाईने केलं. कारण त्यांना स्वतच्या उरातली धग-धमक जाणवलेली होती. सोयराबाई तरी काय वेगळी होती जनाबाईपेक्षा? एकदम ताडफाड होती. तिचीही विठ्ठलावर श्रद्धा होतीच की! परंतु जेव्हा जातीयतेचा काच असह्य झाला तेव्हा सोयराबाईने विठ्ठलाला जाब विचारलाच,
कां वा उदास मज केलें । कोण म्हणे तुम्हां भलें ।।1।।
आम्ही बैसलोंसे दारी । दे दे म्हणोनी मागतों हरि ।।2।।
घेउनी बैसलासी बहुताचें । गोड कैसे तुम्हां वाटे ।।3।।
ही नित नव्हे बरी । म्हणे चोखियाची महारी ।।4।।

एवढंच कशाला, सोयराबाईने प्रसंगी जनाबाईसारखं धाडसही दाखवलं आहे. ती म्हणते, बैसोनी एकांती बोले गुजगोष्टी । घालोनियां मिठी चरणासी। बहु दीस झाली वाटतसे खंती । केधवां भेटती बाई मज । तुम्हांसी तों चाड नाहीं आणिकाची ।
परी वासना आमुची अनिवार ।।
सोयरा म्हणे चला जाऊं तेथवरी ।
गुजगोष्टी चारी बोलुं कांही ।।

जनाबाईला विठ्ठलासाठी डोईचा पदर खांद्यावर घ्यावासा वाटतो, सोयराबाईला गुजगोष्टी करण्यासाठी विठ्ठलाबरोबर काही अंतर चालून जावंसं वाटतं आणि हे सारं त्या उघडपणे व्यक्त करतात, यातच त्यांच्या संतत्वाची प्रचीती येते. याचा अर्थ एवढाच की, आपल्या भावना एवढय़ा उघडपणे बोलून दाखवल्यावरही कुणी आपल्याविरोधात ‘ब्र’ही काढू शकणार नाही, याची त्यांना खात्री आहे.

सतराव्या शतकातल्या संत बहेणाबाई शिऊरकरदेखील यांच्यापेक्षा वेगळ्या नव्हत्या. फक्त त्यांचा विचार आपल्याला जरा वेगळेपणाने करावा लागतो. कारण त्यांच्या पूर्वकाळात ज्या संत स्त्रिया होऊन गेल्या त्यांच्या घरात-कुटुंबात वारकरी संप्रदायाची, विठ्ठलभक्तीची परंपरा होती. बहेणाबाईंच्या घरीदारी मात्र अशी थेट वारकरी संप्रदायाची परंपरा नव्हती… आणि तरीही बहेणाबाई चांगल्या अर्थाने विठ्ठलाच्या नादाला लागल्या.

त्यानंतर सुरू झालेला संत तुकाराम आणि त्यांची शिष्या संत बहेणाबाई यांचा जोडप्रवास पाहण्यासारखा आहे. गुरूच्या पावलावर पाऊल टाकून बहेणाबाई चाललेल्या दिसतात. गुरू कसा, तर पाखंडी समाजावर कोरडे ओढणारा आणि तेवढाच भक्तीचा-मायेचा भुकेलादेखील. म्हणजे एकाच वेळी बुद्धी आणि मन यांचा सुरेख समन्वय सांधणारा. बहेणाबाईंनीदेखील आयुष्यभर तेच केलं. एकीकडे आपल्या जगण्याला शास्त्रकाटय़ाची कसोटी लावली आणि दुसरीकडे भावभक्तीचा मळा फुलवला. म्हणून तर प्रसिद्ध संस्कृत कवी अश्वघोषाच्या ‘वज्रसूची’चं त्या संस्कृतमधून मराठीत भाषांतर करू शकल्या. विशेष म्हणजे मराठी, हिंदी आणि संस्कृत अशा तीनही भाषांवर बहेणाबाईंचं प्रभुत्व होतं.

…अन् मुक्ताई किंवा मुक्ताबाई म्हणजे तर काय, केवळ स्त्री संतच नाही, तर जणू संपूर्ण संत मंडळाचीच आई झाली. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान असे केवळ तिचे भाऊच नाही, तर एकनाथांसारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ संतानेही तिचं कर्तृत्व मान्य करून तिच्यावर आरती लिहिली. चांगदेवासारख्या योग्याची ती गुरू झाली आणि ज्ञानदेवासारख्या तत्त्वचिंतकाची ती मानस सल्लागार झाली. दुनियेवर रागावून ज्ञानदेव झोपडीचं दार लावून समाधिस्थ झाले तेव्हा तिनेच ज्ञानदेवांना केवळ झोपडीच नाही, तर आपल्या मनाचंही कवाड उघडायला भाग पाडलं. ती ज्ञानदेवांना म्हणाली-

सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ।।1।।
बोधा करुं नये अंतर । साधू नाहीं आपपर ।।2।।
जीव जीवासी पैं दयावा । मग करूं नये हेवा ।।3।।
तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।4।।

वारकरी संतपरंपरेतील संत-कवयित्रींच्या अशा या रचना आणि त्यांचं आयुष्य पाहिलं की, स्तिमित व्हायला होतं. चक्रावून जायला होतं. महत्त्वाचं म्हणजे या संत स्त्रियांनी शेकडो वर्षांपूर्वी आपल्या अभंगांतून काढलेले हे उद्गार धाडसाचेच होते, पण तेव्हाच का, ते आताही धाडसाचेच आहेत. समाजपुरुष तेव्हाही सनातनी होता नि आताही आहे. म्हणून तर आजही या संत स्त्रियांची नि त्यांच्या काव्याची तेवढीच गरज आहे.

संत्र स्त्रियांच्या काव्यातील बहुधा हाच मानवमुक्तीचा-मानवकल्याणाचा स्वर गायिका अभिनेत्री योजना शिवानंद यांना महत्त्वाचा वाटला असावा आणि गेली काही वर्षं त्यांनी स्वतला या संत कवयित्रींच्या रचनांशी जोडून घेतलेलं असावं. योजना शिवानंद आणि पं. शिवानंद पाटील या गायक-कलावंत दांपत्याचा ‘अभंगवाणी’चा कार्यक्रम मराठी रसिकांसाठी नवीन नाही. दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन त्याआधारे संतांच्या अभंगांची निवड करायची, मग त्या अभंगांना मान्यवर संगीतकारांकडून चाली लावायच्या आणि त्यानंतर त्या रचना रसिकांसमोर सादर करायच्या ही योजना-शिवानंद दांपत्याची खासियत. यंदाचं त्यांच्या या अभंगवाणीचं 33वं वर्ष होतं आणि यावेळचा अभंगवाणीचा विषय होता – आदिशक्ती मुक्ताई! म्हणजे स्त्रीशक्तीच्याच गौरवीकरणाचा हा प्रयत्न होता. मात्र यंदाच नाही, योजना शिवानंद हा प्रयत्न गेली बारा वर्षं सातत्याने करत आहेत. पं. शिवानंद पाटील हयात असेपर्यंत पंडितजी आणि योजना शिवानंद असे दोघे मिळून कार्यक्रमाच्या विषयाची आखणी करायचे. मात्र एप्रिल 2011 मध्ये पं. शिवानंद यांचं वयाच्या 52व्या वर्षी अकस्मात निधन झालं.

खरं तर त्या वर्षीची अभंगवाणी तोंडावर येऊन ठेपलेली. योजना शिवानंद यांच्या जागी दुसरं कुणी असतं तर कदाचित माघारच घेतली असती, पण योजना शिवानंद यांना माघार घेणं शक्य नव्हतं. अभंगवाणीचा कार्यक्रम म्हणजे पं. शिवानंद यांचा ध्यास आणि श्वासही होता. त्यामुळेच पंडितजी जाऊन एक अख्खं तप उलटलं तरी अभंगवाणी सुरूच आहे… आणि या एका तपात योजना शिवानंद यांना खऱया अर्थाने कुणी साथ दिली असेल तर ती आमच्या वारकरी परंपरेतील स्त्री संतांनी आणि त्यांच्या रचनांनी. या संत स्त्रियांच्या रचनांनी योजना शिवानंद यांना केवळ मार्गच दाखवला असं नाही, तर त्यांना त्यांचा अवकाशही शोधून दिला. त्याचीच परिणती म्हणजे गेली बारा वर्षं योजना शिवानंद आपल्या अभंगवाणीच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या संत कवयित्रींच्या काव्याचा वेगवेगळ्या अंगाने घेत असलेला मागोवा.

आतापर्यंत त्यांनी संत जनाबाई, संत बहिणाबाई शिऊरकर, संत मुक्ताबाई यांच्या रचना आपल्या अभंगवाणीतून सादर केल्या आहेत. त्या सादर करताना वेगवेगळे प्रयोग केले आहेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या स्त्री संतांच्या रचना त्यांच्या विचारांसकट रसिकांच्या मनावर कलम करण्याचं कसब त्यांना साधलेलं आहे.

पुरुष संतांना कमी लेखण्याचं कारण नाही. साऱयाच संतांनी समाजोद्धारकाचीच भूमिका बजावली. मात्र एक प्रकारे स्त्री संतांच्या रचनांची अडलेली वाट योजना शिवानंद आपल्या अभंगवाणीतून मोकळी करत आहेत असं वाटतं!

[email protected]