सत्याचा शोध – महाराष्ट्र भूमीतील अविवेकी वादळ

>>चंद्रसेन टिळेकर

महनीय व्यक्तीच्या पायाची धूळदेखील आपला उद्धार करील असा भ्रम करून घेणे हे शुद्ध वैचारिक गुलामगिरीचे, भ्रमिष्टपणाचे लक्षण आहे यात काही वादच नाही, पण दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये भक्तीच्या नशेत गुंग होणे यात माणसे धन्यता मानू लागली आहेत आणि हे अत्यंत अनिष्ट असे लक्षण आहे. समाजाच्या तळागाळात जाऊन यासंदर्भात प्रबोधन कसे करावे, हा एक मोठा प्रश्नच आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्र आणि देशभर श्रद्धेचा, व्यक्तिपूजेचा आणि एकूणच भक्तीचा जो डोंब उसळला आहे तो पाहून कुणालाही पुढच्या पिढीबद्दल चिंताच वाटेल. पूर्वी कधी नव्हे तेवढे बाबा, बुवा, महाराज, माता आता देशाच्या प्रत्येक प्रांतातल्या गल्लीबोळात दिसू लागले आहेत. गेल्या लेखात यासंदर्भात ‘गुरूविना कोण लावील वाट’ हा लेख लिहिला होता. पुन्हा या विषयावर इतक्या लवकर लिहावे लागेल असे वाटले नव्हते, पण मधल्या काळात एक-दोन घटना अशा घडल्या की, त्यावर भाष्य करणे क्रमप्राप्तच होते. या घटना हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत काहीशा विस्मरणातही जातील, परंतु त्याप्रसंगी या देशातील भाविकांनी ज्या प्रकारे आपली भक्ती प्रदर्शित केली त्यावरून आमच्या देशातील फार मोठा समाज भक्तीच्या संदर्भात पूर्णतः मतिमंद झाला आहे हे नजरेआड करता येत नसल्याने इथे काहीशी पुनरुक्ती करावीशी वाटते. अर्थात प्रबोधन हे श्वासोच्छ्वासारखे सातत्याने करावेच लागत असल्याने ही पुनरुक्तीदेखील आवश्यकच ठरते.

पहिली घटना आहे उत्तर प्रदेशात हाथरस इथे एका बाबाच्या सत्संगात घडलेल्या भक्तांच्या चेंगराचेंगरीची! भोलेबाबा नामक एका बाबाच्या प्रवचनाला लोकांनी लाखोच्या संख्येने हजेरी लावली होती. हा बाबा कोण, त्याची पार्श्वभूमी काय याचा शोध कोणालाही घ्यावासा वाटला नाही याचे आश्चर्य वाटते. हा भोलेबाबा काही काळ पोलीस खात्यात होता, परंतु त्याच्या दुर्वर्तनामुळे त्याला बडतर्फ केले गेले. हा माणूस पुढे ‘बाबा’ होण्याचे साहस करतो आणि सर्वसामान्य माणसे त्याच्या चारित्र्याची कसलीही शहानिशा न करता त्याच्या भजनी लागतात ही आपल्या देशवासियांची मोठी शोकांतिका आहे, अत्यंत चिंतनीय अशी बाब आहे. या बाबाच्या सभेत चेंगराचेंगरी का झाली, याचे सत्य जेव्हा समोर आले ते ऐकून आपण मेंढरांच्या देशात तर राहत नाही ना, अशी शंका येते. सत्य परिस्थिती अशी आहे की, बाबा मंडपाच्या बाहेर पडतो न पडतो तोच तो ज्या मार्गावरून चालत गेला त्या मार्गावरची धूळ ज्याला भक्तगण ‘चरणधूळ’ म्हणतात ती आपल्या कपाळाला लावायला मिळावी म्हणून जमावाने तिकडे धाव घेतली. त्या जमावात नेहमीप्रमाणे अधिक तर स्त्रिया होत्या हे सांगणे न लगे.

महनीय व्यक्तीच्या पायाची धूळदेखील आपला उद्धार करील असा भ्रम करून घेणे हे शुद्ध वैचारिक गुलामगिरीचे, भ्रमिष्टपणाचे लक्षण आहे यात काही वादच नाही, पण दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये भक्तीच्या नशेत गुंग होणे यात माणसे धन्यता मानू लागली आहेत आणि हे अत्यंत अनिष्ट असे लक्षण आहे. समाजाच्या तळागाळात जाऊन यासंदर्भात प्रबोधन कसे करावे, हा एक मोठा प्रश्नच आहे. याप्रसंगी प्रकर्षाने गाडगेबाबांची आठवण होते. (गाडगेबाबा ज्या गावात, आडगावात एस.टी. जात नव्हती तिथे जाऊन आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करीत.)

या भोलेबाबाच्या सत्संगाला जवळ जवळ दोन लाख भक्तगण जमले होते. त्यावरून या चेंगराचेंगरीची कल्पना यावी. दीडशे भक्त मृत्युमुखी पडले तर दोनशेच्या वर जखमी झाले. हा काही एकटाच सोवळा असा प्रसंग नव्हे. यापूर्वी बागेश्वर बाबा आणि अनिरुद्ध महाराज यांनी ‘विशिष्ट दिवशी रुद्राक्ष धारण केल्यास आलेली संकटे टळतात’ असे आपल्या प्रवचनातून सांगितल्यामुळे भक्तांनी कसलीही शहानिशा न करता ते विकत घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली आणि तेव्हाही अशीच प्रचंड चेंगरा चेंगरी झाली होती. पण भक्त मंडळी काही त्यापासून बोध घ्यायला तयार नाहीत. याचे कारणच मुळी हे आहे की, भक्ती तुमचा मेंदू गोठवून टाकते. सारासार विचार करू देत नाही, परंतु हे मानायला आमचे सर्वसामान्य हिंदवासीय मुळी तयारच नाहीत. ‘भक्तीही तोलू व्यवहारे’ असे कुसुमाग्रज म्हणतात, पण ते पुस्तकातच राहते, व्यवहारात उतरत नाही याचे वैषम्य वाटते. कुणाही शहाण्या माणसाला असा प्रश्न पडेल किंवा पडला पाहिजे की, हे बाबा, बुवा, महाराज, माता असे काय सांगतात की, जे आपल्या आई-वडिलांनी, शिक्षकांनी आपल्याला सांगितलेले नसते?

ही चेंगराचेंगरी ज्या कारणासाठी झाली त्यावरून अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, आपल्या भक्तीच्या कल्पनाही काहीशा रानटीच आहेत. व्यक्ती कितीही महान असली म्हणून काय तिच्या पायाखालची धूळ आपल्या कपाळाला लावायची? अतिरेकी आंधळी भक्ती ही मेंदूला बुद्धिमांद्य आणते, तेव्हा ती तोलून मापून केली पाहिजे हे जेव्हा आपल्याला समाजाला समजेल तेव्हा सध्याचे घोंगावत असलेले अविवेकी वादळ शमेल अशी आशा करूया!

[email protected] (लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)