
>> प्रेमसागर मेस्त्री
पाण्याशिवाय स्थलांतर अशक्य… बगळे, बलाक,
करकोचे असे पक्षी म्हणजे थेट
पाण्यावर अवलंबून असणारे पाणथळ प्रदेशातले पक्षीगण…
मुग्धबलाक (ओपन बिल्ड स्टॉर्क), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), पाणकावळा, खंडय़ा, कुदळे, छोटा खंडय़ा, बगळे, जलकोपात, जांभळी पाणकोंबडी, राखी बगळा, पर्पल हेरॉन, युरेशियन कूट, हळदकुंकू बदक असे पाणपक्षी पाहायचे असतील तर पाणथळ ही एकमेव जागा. टिल, पोचार्ड, विजन, गडवाल, थापटय़ा, पिनटेल, गारगनी, कॉटन पिग्मी गूज ही विविध प्रकारची बदके हिवाळ्यात स्थलांतर करून आपल्याकडील अनेक तलावांवर येतात. त्याशिवाय गॉडविट, सॅंड पायपर (तुतवार), क्रेक, रफ, स्मॉल प्रॅटीनकोल हे दलदलीत आढळणारे स्थलांतरित पक्षीसुद्धा येतात. पक्षी निरीक्षकांच्या नोंदीनुसार सुमारे 340 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी महाराष्ट्र राज्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात आपल्याला पाहवयास मिळतात.
नाशिक येथील निफाड तालुका येथे ‘नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य’ ही पक्ष्यांची पंढरी असलेले पाणथळ परिसंस्था संरक्षित क्षेत्र आहे. ते महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. हे अभयारण्य 1982 साली अतिसंरक्षित संवर्धन पाणथळ म्हणून घोषित करण्यात आले तर जानेवारी 2020 मध्ये त्याला महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ म्हणून दर्जा देण्यात आला. जलाशय परिसंस्था म्हणून पर्यावरणीय महत्त्व असलेल्या या ठिकाणी हजारो पाणथळ पक्षी अन्न, विश्रांती निवासस्थान, वातावरण, अनुकूल तापमान आणि सुरक्षा यासाठी येतात. या अभयारण्याचे ‘रामसर साईट’ पदनाम हे ओलसर प्रदेशांच्या संवर्धनाबाबतची आपली भूमिका ठळक करते. महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेमध्ये नांदूर मधमेश्वर पाणथळ एक अतिशय सकारात्मक योगदान देत आज उभे आहे.
इराणमध्ये ‘रामसर’ येथे 1971 साली जागतिक पातळीवर पाणथळ जागा संवर्धित करण्यासाठी 72 देशांतील प्रतिनिधी एकत्र आले. याला ‘रामसर कन्व्हेन्शन’ म्हणून संबोधले गेले. रामसर साइट्सचे संरक्षण आणि त्यांच्या संसाधनांचा सतत वापर करणे हा या कन्व्हेंशनचा उद्देश आहे. रामसर साइट्सच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या संसाधनांचा सतत वापर करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य केले जाते. रामसर साइट्सच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या संसाधनांचा सतत वापर करण्यासाठी कडक निर्बंध ठरविण्यात आले आहेत. यावर नवीन संकल्पना संशोधन करून सुधारणात्मक बदल करण्यासाठी सदस्य देशांमध्ये दर तीन वर्षांनी संमेलन होते. या संमेलनाचे उद्दिष्ट म्हणजे नेमके रामसर करार करून दरवर्षीचा नव्या पाणथळ परिसंस्था संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर काही निकष ठरवून ती जागा निश्चित करणे हे होय.
मला आठवते, 1997 साली पुण्याच्या इला फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांच्यासोबत मी आणि चिपळूण इथला विश्वास जोशी आम्ही कवी कुसुमाग्रज अर्थातच साहित्य क्षेत्रातील भीष्माचार्य आदरणीय वि. वा. शिरवाडकर यांच्या निवासस्थानी राहिलो होतो. त्यांच्याकडून भारताचे पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या आठवणींचे किस्से ऐकले आणि साहित्यिक मंडळी निसर्गविश्वात किती एकरूप होऊन त्यांची शब्दरचना साहित्य म्हणून उपलब्ध करून देतात हे याची देही याची डोळा अनुभवले. या निसर्गवाचक लेखकांमध्ये संवर्धन, संवेदना किती मुरलेली असते हे लक्षात येते. पुढे त्यांनी या गोदावरी नदीच्या सगळ्या कथा, किस्से ऐकवले.
1911 साली गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर बंधारा बांधण्यात आला. त्यातील पाणी पुढे दोन्ही बाजूंच्या कालव्यांद्वारे सोडण्यात येऊ लागले. त्यामुळे गाळ, दलदल, गाळ साठून नदीपात्रात उंचवटे अशी भूरूपे तयार झाली. पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक असलेले मासे, शैवाल, दलदलीतील कीटक येथे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे येथे पक्ष्यांची संख्या वाढत गेली. पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात येथे सुमारे 39000 च्या वर पक्षी आढळत असल्याची नोंद आहे. ही गोष्ट 1982 मध्ये ज्येष्ठ पक्षी तज्ञ
डॉ. सलीम अली यांनी नमूद केली. नांदूर मधमेश्वरला भेट दिल्यानंतर, ‘हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे,’ असे उद्गार त्यांनी काढले. सरकारला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली. पुढे 1986 मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात या लेखक मंडळीनी आणि स्थानिक लोकांच्या सहभागाने प्रयत्न केले गेले आणि हे अभयारण्य नावारूपास आले. इथे उत्तर ध्रुवीय, मध्य युरोप अशा अनेक भागांतून स्थानांतरित पक्षी येतात. तेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याचे भूषण म्हणून पक्षीवैभव टिकवून ठेवण्यासाठी असलेली ही भन्नाट वेटलॅण्ड ‘रामसर साईट’ नक्कीच नव्या पिढीला पाणथळ पक्षीविश्वाची भुरळ घालणारी ठरेल हे निश्चित. दर वर्षी पक्षी प्रजाती आणि त्यांची गणसंख्या घट हा मात्र चिंतेचा विषय आहे.