वेब न्यूज – जादूचे बेट

>> स्पायडरमॅन

विज्ञान,  तंत्रज्ञान, शिक्षण, पुरोगामीपण या सगळय़ांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. असे असतानादेखील अनेक सुशिक्षित लोक आपल्या आजारांवर, आयुष्यातील समस्यांवर तंत्र-मंत्र, जडीबुटी अशा माध्यमांतून रामबाण उपाय शोधत असतात. हे लोक जगाच्या सगळय़ा कानाकोपऱ्यात आढळतात. या लोकांसाठी स्वर्ग मानले जाणारे फिलिपिन्सचे सिक्विजोर बेट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आपल्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या बेटावर आजच्या आधुनिक काळातदेखील अनेक रोगांवर जादूटोणा आणि स्थानिक जडीबुटीच्या मदतीने उपचार करणारी केंद्रे लोकांना सेवा देत आहेत. या बेटावरील सुविधांचा लाभ फक्त फिलिपिन्सचे स्थानिक लोक घेत नाहीत, तर इथे आपल्या आजारपणावर, समस्यांवर उपचार शोधण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. कॅथलिक धर्माचे पालन करणाऱ्या स्पॅनिश प्रवाशांनी ही उपचार पद्धती इथे सुरू केली असे मानले जाते. 16 व्या शतकात सुरू झालेल्या या उपचार पद्धतीमध्ये पोषण बनवले जाते, अर्थात बाटल्यांमध्ये विविध जडीबुटी टाकून त्यांचा रस बनवला जातो आणि पुढे त्या रसापासून योग्य औषध बनवले जाते. औषधाबरोबर मंत्राच्या सहाय्याने शरीर व आत्म्यावरील नकारात्मक परिणाम काढून टाकले जातात.

या बेटावर 300 पेक्षा जास्ती वनऔषधी आढळून येतात. इथे रोगावर उपचार करणाऱ्या व्यक्तींना अत्यंत सन्मानाने वागवले जाते. ते रुग्णांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकाच प्रकारची सेवा उपलब्ध करून देतात. इथे वारंवार येणारे पर्यटक सांगतात की, तुम्ही या बेटावर या, मस्त पोहण्याचा आनंद घ्या आणि तुमच्या स्थानिक ड्रायव्हरला तुमच्या आजाराबद्दल कल्पना द्या. तो एका झटक्यात तुम्हाला उपचारासाठी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवेलदेखील. आधुनिक आणि पाश्चात्त्य औषधेदेखील ज्या रोगांवर उपचार करू शकत नाहीत, त्या रोगांवर इथल्या पारंपरिक औषधांनी उपचार शक्य आहे असे इथल्या प्रत्येक स्थानिकाचे मत आहे. विज्ञानाच्या जगात या बेटावरील पारंपरिक औषधोपचार पद्धतीचादेखील अभ्यास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे.