>> प्रांजल वाघ
सुरपूर संस्थानाची एकेकाळची राजधानी वागीनगेरा! हिंदुस्थानच्या इतिहासात एका फार मोठय़ा घटनेचे साक्षीदार असणारे हे गाव. जिथली लढाई औरंगजेबाची शेवटची लढाई ठरली.
2017 सालच्या मार्च महिन्यात कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसमधून आम्ही एका छोटय़ाशा खेडय़ात उतरलो. घडय़ाळाचे काटे तीनच्या पुढे सरकू लागताच दुपारची उन्हं थोडी नरम पडू लागली. गावाबाहेरील चहाच्या टपरीजवळील चावडीवर पाठपिशव्या उतरवल्या आणि गावामागे असलेल्या तटबंदीयुक्त डोंगराकडे गेलो. वागीनगेरा! सुरपूर संस्थानाची एकेकाळची राजधानी. हे गाव कर्नाटकातील यादगिरी शहराच्या नैऋत्येस असून बसने यादगिरी-शहापूर-सुरपूर करत वागीनगेऱयाला पोहोचता येते. मराठय़ांच्या इतिहासात या गावाचा ‘वाकीनखेडा’ असाही उल्लेख आला आहे.
त्या गावात पोहोचलो, तेव्हा आमचे लक्ष्य होते फक्त इथला किल्ला पाहणे, पण हिंदुस्थानच्या इतिहासात हे गाव एका फार मोठय़ा घटनेचे साक्षीदार आहे याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. सन 1705 मध्ये बेडर नायक संस्थानाचा राजा पितांबर बहारी पिड नायक व मुघल यांच्यामध्ये इथे घमासान युद्ध झाले आणि या युद्धात मुघलांच्या बाजूने रणांगणात प्रत्यक्ष उतरला होता त्यांचा आलमगीर औरंगजेब. इतकंच नव्हे, तर ही लढाई औरंगजेबाची शेवटची लढाई ठरली!
पण ही सगळी माहिती आम्हाला फार नंतर कळली. त्या दिवशी किल्ल्याच्या पायऱया चढता चढता असे लक्षात आले की, उजवीकडे एक सरोवर आहे आणि त्या सरोवरापलीकडे एका छोटय़ा टेकडीवर आणखी एक किल्ला उभा आहे. या छोटय़ा किल्ल्याचे नाव आहे ‘होसकिल्ला’ म्हणजे ‘नवा किल्ला’ आणि वागीनगेऱयाच्या मुख्य किल्ल्याचे नाव ‘पदुकोट!’ पदुकोट किल्ल्याच्या पायऱया काटकोनात वळल्या आणि आम्ही महाद्वारातून किल्ल्यात प्रवेश केला.
विजयनगर साम्राज्यातर्फे लढणारे बेडर नायक हे पुढे आदिलशाहीचे मांडलिक झाले. भीमा-कृष्णा नद्यांच्या दोआबातील प्रदेश जहागीर म्हणून आदिलशहाने त्यांना दिली. पहिल्या पिड नायक राजाने करशीहळ्ळी येथील डोंगरावर एक किल्ला बांधला आणि त्याला नाव दिलं वागीनगेरा – म्हणजे ब्रह्माचा डोंगर. इथून पुढे 1705 पर्यंत वागीनगेरा किल्ला सुरपूर संस्थानाची राजधानी राहिला.
किल्ल्याच्या आत प्रवेश करताच एक सुंदर सभामंडप आमच्या नजरेस पडला. तिथून थोडं पुढे गेल्यावर एक नैसर्गिक दगडी ‘बुरूज’ समोर उभा ठाकतो. या बुरुजावर तटबंदीचे अवशेष आहेत आणि पायथ्याला छोटय़ा भुयारात वेणुगोपाल मंदिर! थोडं आणखी पुढे चालत आलो आणि नजरेस पडलं ते एक अर्धवट बांधलेलं मंदिर जे औरंगजेबाच्या सैन्याने उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख आहे.
किल्ल्यात शिरल्यावर उजवीकडे पायऱया असलेली एक मोठी बारव आहे. किल्ल्याच्या वरच्या भागात ही बारव आणि गावाकडच्या खालच्या किल्ल्यात दुसरी एक मोठी विहीर आहे. किल्ल्यातील हे दोन मोठे पाण्याचे स्रोत. इथून तटबंदी वरुन आम्ही पुढे चालत गेलो आणि वरच्या किल्ल्याला खालच्या किल्ल्याशी जोडणारा आणखी एक मोठा दरवाजा लागतो. या दरवाजावर एक फार्सा शिलालेख आहे. 1705 मध्ये किल्ला जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने हा शिलालेख इथे कोरून ठेवलाय!
1686 मध्ये आदिलशाही खालसा केल्यावर सुरपूर संस्थानाचे राजे असलेल्या नायकांवर वाईट दिवस आले. त्यांचं छोटेखानी संस्थान मुघल सरकारात जमा करावे लागले आणि एक साधा पंचहजारी मनसबदार म्हणून राहावे लागले. या असंतोषाचा स्फोट 1688 मध्ये नायकाच्या मृत्यूनंतर झाला. हातातून गेलेले किल्ले मुघलांकडून हिसकावून घेतले आणि वागीनगेरा किल्ल्यावर नायकांची राजधानी पुन्हा वसवली.
आता औरंगजेबाची पादृष्टी वागीनगेऱयावर पडली! नऊ हजार नायकांच्या सैन्यावर 40 हजार मुघल सैन्याने हल्ले सुरू केले आणि किल्ल्याला वेढा दिला. छोटेखानी होसकिल्ला जिंकून घेतला आणि मग अंतिम संघर्षाची सुरुवात झाली. 87 वर्षांचा खासा आलमगीर आपल्या घोडय़ावर बसून तोफखान्याजवळ रणांगणावर उभा राहिला. मुघली तोफा किल्ल्यावर आग ओकू लागल्या. एक दंतकथा सांगितली जाते की, मुघलांच्या एका हल्ल्यास नायकांनी इतका जोरदार विरोध केला की, किल्ल्याची भिंत आणि तिथली जमीन मुघलांच्या रक्ताने लाल झाली आणि त्या भागास ‘लालगढ’ म्हटले जाऊ लागले, पण औरंगजेबाने पदुकोटाचा खालचा भाग जिंकून घेतल्यावर पो उलटी फिरू लागली. जवळच असलेल्या मराठय़ांचे सरसेनापती धनाजी जाधव यांनी पिड नायकाला संदेश पाठवला – ‘मुघलांना किल्ला देऊन टाका आणि आमच्या सैन्यास येऊन मिळा! किल्ला परत घेता येईल!’ पिड नायकाने मराठय़ांचा सल्ला मानला. रातोरात किल्ला रिकामा करून नायक निसटले.
औरंगजेब मरण पावल्यावर पिड नायकाने मराठय़ांची रणनीती अवलंबून गुपचूप पुन्हा वागीनगेरा किल्ला जिंकून घेतला आणि आलमगीरचा शेवटचा विजय फोल ठरवला. पुढे त्याने सुरपूरला नवीन राजधानी वसवून 1858 पर्यंत नायकांचे राज्य तिथे राहिले.
वागीनगेरा, सुरपूर आणि तिथे असलेल्या अनेक वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकदा वेळ काढून नक्की भेट द्या!