
>> विनायक
वाढत्या जागतिक तापमानामुळे म्हणा किंवा बदलत्या हवामानामुळे म्हणा, उन्हाळ्याची चाहूल लागलीय. याचा वातावरणावरचा परिणाम म्हणजे समुद्राच्या आणि इतर सर्वच पाणवठ्यांमधल्या पाण्याची वाफ व्हायला सुरुवात होणे. याशिवाय आपल्याला इथे महाराष्ट्रात जाणवत नाही अशी गोष्ट म्हणजे पृथ्वीवरचे हिमसाठे हळूहळू वितळायला आरंभसुद्धा होणे. पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर गोलार्धात तीव्रतेने प्रकाशणाऱ्या सूर्याचा काळ पृथ्वीच्या अक्षाशी निगडित असतो. सध्या सूर्याचं भासमान भ्रमण आपल्याला उत्तरेकडे होताना जाणवतंय. 21 डिसेंबरलाच ‘उत्तरायण’ सुरू झालंय. या महिन्याच्या 21 तारखेला सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर उगवेल आणि पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातला उन्हाळा तीव्र होऊ लागेल. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगची कृत्रिम भर.
यानिमित्ताने असा विचार आला की, पृथ्वीवर सुमारे 71 ते 75 टक्के पाणी आहे. बाकीचा भाग सात खंडांचा. त्यावरही सुमारे 2 टक्के बर्फाच्छादित प्रदेश आढळतो. पृथ्वीवरचा सर्वाधिक हिमाच्छादित प्रदेश म्हणजे ग्रीनलॅण्डसारखा अवघ्या 25 हजार लोकवस्तीचा देश. त्याविषयी आपण काही माहिती याच स्तंभातून घेतली आहे. दुसरा प्रचंड बर्फाच्छादित प्रदेश म्हणजे अंटार्क्टिका किंवा पृथ्वीचा दक्षिण ध्रुवीय प्रदेश. अधूनमधून या भागातील एखाद्या प्रचंड मोठ्या शहराच्या आकाराचे हिमखंड जागतिक उष्णतेमुळे निसटून विलग होतात. ते वेगाने उत्तरेकडे सरकले तर काय होईल याच्या बातम्याही येत राहतात आणि कालांतराने बर्फासारख्याच वितळून जातात.
क्वचित एखादा श्रीमंत आखाती देश वाळवंटातली तहान भागवण्यासाठी श्रीमंतीच्या जोरावर दक्षिण ध्रुवावरचा प्रचंड हिमखंड खेचून आणण्याचीही योजना आखतो. अशा किती प्रत्यक्षात आल्या ठाऊक नाही. त्यांची चर्चा मात्र होते आणि थंडावते. तर आपल्या पृथ्वीवरचे उत्तर-दक्षिण ध्रुव प्रदेश, आपल्याकडचा हिमालय, काराकोरम युरोपातील आल्बस्, अमेरिकेतील अॅन्डीस असे अनेक हिमाच्छादित पर्वत आहेत. त्या सर्वांमध्ये आपल्या हिमालयातलं एव्हरेस्ट शिखर सर्वात उंच आहे हे आपण जाणतोच.
मात्र उन्हाळ्याच्या दिवसात या सगळ्या हिमाच्छादित पर्वतांवरचा बर्फ वितळू लागतो. त्याचं पाणी होऊन त्यातून उगम पावणाऱ्या नद्यांना ‘उन्हाळी पूर’ येतो. या गोष्टी आपल्या देशात गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना आणि त्यांच्या सर्व उपनद्यांच्या किनारी राहणाऱ्या लोकांना जाणवतात. हिवाळ्यात ‘साठवलेला’ बर्फ हिमालय पाण्याच्या रूपाने सागराकडे ‘परत’ पाठवतो. त्यामुळे पृथ्वीवरचा एकूण जलसाठा आहे तसाच राहिला तरी तो सर्वत्र सारखा मात्र असत नाही. पृथ्वीवरच्या गोड्या पाण्याचा थेंब न् थेंब आपण उपयोगात आणू शकलो तर वाळवंटातही हिरवळ फुलेल, परंतु या सर्व गोष्टी खूप खर्चिक असतात.
पृथ्वीवरचा बर्फ दक्षिण-उत्तर ध्रुव आणि अधलामधला भाग जमेस धरता सुमारे 10 टक्के भूभागावर पसरलाय. त्या सगळ्याचा हिशेब मांडला तर तो 30 लाख घन किलोमीटर एवढा होईल. या बर्फापैकी हिमखंड (ग्लेशिअर) साकळलेलं हिमरूपी पाणीच दीड कोटी चौरस किलोमीटर व्यापणारं आहे. पृथ्वीवर एकूण 1 लाख 98 हजार हिमखंड आहेत. सर्वाधिक हिमखंड 18 हजार वर्षांपूर्वी होते असं म्हटलं जातं.
एकट्या हिमालयावर सात हजार घन किलोमीटर बर्फ साठलाय. तो सगळा एकदम वितळला तर पृथ्वीवरच्या सागरांची पातळी दोन सेंटिमीटर वाढेल. हिमालयाच्या पश्चिम भागात जास्त, तर मध्यभागी कमी बर्फ आहे. या हिमालयाचं आकर्षण आपल्याला पूर्वापार. महाकवी कालिदास यांच्या ‘कुमार संभवम्’ या काव्याची सुरुवातच ‘अस्त्युत्तरस्य दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः’ अशी आहे. याचा अर्थ उत्तर दिशेला हिमालय नावाचा पर्वतराज आहे असा होतो.
हिमालयासकट पृथ्वीवरचे सर्वच 30 लाख घन किलोमीटर हिम वितळले तर विविध समुद्राचं पाणी सुमारे 230 फुटांनी वाढेल आणि मुंबई, न्यूयॉर्कसारखी सागरकिनारी असलेली महानगरं जलमय होतील. अर्थात असं घडणं एकाएकी शक्य नाही आणि केवळ सर्व ग्लेशिअर्स वितळले तर सागरपातळीत 24 फूट वाढ संभवते.
पृथ्वीवर कालांतराने हिमयुगंसुद्धा येत असतात. आतापर्यंत ज्ञात अशी 5 हिमयुगं म्हणजे 2.4 अब्ज ते 2.1 अब्ज वर्षांपूर्वी पहिलं, 8.50 ते 6.37 कोटी वर्षांपूर्वी दुसरे, 4.60 ते 4.70 तिसरं, 3.60 ते 2.00 चौथं आणि वीस कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेलं हिमयुग ‘संपलेलं’ नाही, पण ते तुलनेने खूपच ‘उष्ण’ आहे याचा अनुभव आपण घेतच आहोत.
याच वाढत्या उष्णतेमुळे 1901 ते 2018 पर्यंत पृथ्वीवरच्या समुद्रांची पातळी 15 ते 25 सेंटिमीटर वाढली असा अंदाज आहे. 1974 पासून सागराच्या उंचीत दीड मिलिमीटर वाढ झाली आहे. यापुढचं हिमयुग आपल्या हयातीत येण्याचा धोका नाही, परंतु बदलत्या तापमानामुळे पृथ्वीवरचा आहे तो बर्फ वितळू लागला तर मात्र किनारपट्टीच्या भागांना तो धोक्याचा इशारा ठरेल. तसंच घडतंय असं म्हणणारे…आणि तसं काही नाहीच असंही सांगणारे आपल्या पृथ्वीतलावरचे बुद्धिमान सजीव आपल्यापैकीच!