विज्ञान-रंजन – अवकाशी पाषाणः होबा!

>> विनायक

नवल  वाटाव्या अशा काही गोष्टी आपल्या पृथ्वीवर आहेत. त्यातलाच एक ‘होबा’ नावाचा लोखंड आणि निकेल धातूंनी बनवलेला चौरस आकाराचा खणखणीत महापाषाण होबा! दक्षिण आफ्रिका खंडात पश्चिमेकडच्या नामिबिया नावाच्या देशात तो 1920 मध्ये सापडला. आता त्याचं तिथं जागतिक महत्त्वाची वस्तू म्हणून संरक्षण होतंय. कुणी म्हणेल दगडासारखा दगड किंवा साधा धातूचा ठोकळा, तोसुद्धा आठ गुणिले आठ असा चौरसाकार आणि तीन फूट जाडी असलेला.. त्यात विशेष ते काय? लोखंडाच्या कारखान्यात यापेक्षाही मोठे धातूचे ठोकळे असू शकतात.

खरंच आहे ते. यापेक्षा मोठे ठोकळे जरूर असू शकतात. पण नामिबियातला हा ‘ठोकळा’ साधासुधा नाही. थेट अवकाशातून येऊन पृथ्वीवर घट्ट रुजलाय. इतका की तिथून तो आजतागायत हलवलेला नाही. उलट त्याची ‘डिस्कव्ही’ झाल्यापासून त्याचं महत्त्व वाढतच गेलंय. आधी एक सांगायला हवं की, नामिबियन भाषेत ‘होबा’ म्हणजे गिफ्ट किंवा भेटवस्तू. जिथे हा होबा सापडला त्या जमीनमालकाने तो सरकारला भेट दिला म्हणून होबा!

मात्र ही ‘गिफ्ट’ खरोखरच मिळाली आहे ती अंतराळाकडून पृथ्वीला! सुमारे 80 हजार वर्षांपूर्वी हा लोहपाषाण, एक अशनी म्हणून पृथ्वीवर आदळला. त्याने त्या वेळी तिथे काय उत्पात केला असेल ठाऊक नाही. कदाचित मानवी वस्ती नसलेल्या काळात त्याने तिथली वनश्री नष्ट केली असेल किंवा काही प्राणीमित्रांचा घास घेतला असेल. त्याची निश्चित नोंद नाही.

साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आदळलेला ‘चिक्सलब’ नावाच्या महापाषाणाने जो उत्पात घडवला त्याने सारा भूगोल हादरलाच, पण डायनॉसोर नावाची महाकाय प्राण्यांची प्रजाती समूळ नष्ट झाली. हे प्राणी पृथ्वीवर जवळपास सर्वत्र पसरले होते. छोटय़ा प्राण्यांना भक्ष्य करत होते. तोपर्यंत आज मोठय़ा दिसणाऱ्या प्राण्यांची वाढ आजच्याइतकी होतच नव्हती. घोडय़ाचा आकार मोठय़ा कुत्र्याएवढा होता म्हणतात. याविषयी नंतर एखाद्या लेखात.

तर होबा! सुमारे 80 हजार वर्षांपूर्वी 64 टन वजनाचा हा चौरस धातुपाषाण ताशी 6140 किलोमीटर वेगाने पृथ्वीवर आदळला! तेव्हापासून तो पृथ्वीवरचा एकसंध असा सर्वात मोठा अवकाशी पाषाण ठरला आहे. त्यामध्ये 84 टक्के लोखंड आणि 16 टक्के निकेल धातू आहे. आता तो नामिबियाची राष्ट्रीय संपत्ती असल्याने ‘वितळवला’ जाणार नाही. अन्यथा त्याबद्दलची माहिती नसताना एखाद्या खाणमालकाने पूर्वीच तो वितळवलाही असता. परंतु तो एका शेतकऱ्याच्या शेतात भूपृष्ठाखाली दडला होता आणि वर शेती होती म्हणून वाचला!  हे शेत जेकोबस हर्मेनस ब्रिट्स यांच्या मालकीचं होतं. एकदा जरा खोल नांगरणी करताना नांगराचा फाळ खणकन् वाजला आणि औत ओढणारा बैल अडखळला. जमिनीखाली इतकी कठीण वस्तू कोणती असावी या कुतूहलाने ब्रिट्स यांनी जमीन खणायला सुरुवात केली. तर हा आठ गुणिले आठ फुटांचा लोखंडी पाषाण सापडला. हे घडलं 1920 मध्ये. मात्र ब्रिट्स यांनी ही गोष्ट धातुशास्त्रज्ञांना कळवली आणि त्यांच्या लक्षात आलं की हा पाषाण मूळचा पृथ्वीवरचा नाहीच. तो अवकाशातून आलेला आहे. फ्रेड्रिक केणल यांनी त्यांचा फोटो नंतर प्रकाशित केला.

नंतर 1955 मध्ये भूमालक झालेल्या शील यांच्याकडून ती जागा घेऊन तेथील सरकारने हा पाषाण राष्ट्रीय म्हणून जाहीर केला. आता तर तो जागतिक वारसाच ठरलाय. कारण 1987 मध्ये जमीनमालकांनी ‘होबा’ नामिबियाच्या सरकारला ‘भेट’ दिला. अशी ही अवकाशी भेटवस्तू तिथल्या सरकारची झाली. सध्या ते एक प्रेक्षणीय ठिकाण झालं आहे.

हा धातुपाषाण अवकाशी आहे. याची तपासणी ग्रटफन्टिन येथील ‘साऊथ-वेस्ट आफ्रिका कंपनी’च्या संशोधकांनी प्रयोगशाळेत केली. हा दगड इथला नाही हे कळायला त्या शेतातील इतर जमिनीचा पोत आणि त्यातीन मिनरलचा (धातूंचा) अभ्यास अर्थातच केला गेला असणार. शिवाय असा लोखंडी ठोकळा, एवढय़ा प्राचीन काळी, कोण कशाला शेतात आणून टाकेल? बरं. तो ताशीवही नाही. शिवाय पृथ्वीच्या वातावरणाशी प्रचंड घर्षण झाल्याच्या खाणाखुणाही त्यावर सापडल्या असणारच. अशा अनेक निकषांद्वारे पृथ्वीवरचे आणि अंतराळातून (क्वचितच) आलेले दगड यात फरक करता येतो. आम्ही आपल्या महाराष्ट्रातील लोणारला पहिल्यांदा (1992) भेट दिली. तेव्हा मुंबई विद्यापीठाच्या काही कॉलेजातील ‘मेटलर्जी’ विभागातील प्राध्यापकांशी चर्चा केली होती. त्या वेळी नुसता अग्निजन्य दगडाचा अशनी हा एरोलाइट, धातूचा सिडेरलाईट आणि मिश्र प्रकारचा सिडेरॉलाइट प्रकारात येतो. शिवाय काचेसारखा पृष्टभाग असणारे टेक्टाइटसुद्धा असतात. काही वेळा अशनीच्या प्रचंड आघाताने काचगोलकही (ग्लास स्पेरूल) तयार कसे होतात हे जाणून घेतलं आणि नंतर अवकाशी दगडांचे काही अवशेष, अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये (पीआरएल) जतन केलेलेही पाहिले. त्यातूनच लोणारला पडलेला अशनी, अग्निजन्य खडकासारखा असल्याने इथल्या भूकवचात मिसळून गेल्याचं लक्षात आलं. मात्र 1972 ते 76 या काळातील लोणार सरोवरातील खोल उत्खननातून दगडचुऱ्यात जे ‘मॅस्कलनाइट’ सापडलं त्यावरून अशनी-आघात झाल्याचं सिद्ध झाल्याचंही समजून घेतलं. अवकाशाचा अभ्यास करताना पृथ्वीचं भान ठेवावंच लागतं. कारण आपण पृथ्वीवर आहोत आणि अशनीप्रमाणेच पृथ्वीही अवकाशातच फिरतेय त्यांची आपली भेट कधीतरी होणारच. पण भेट विनाशी न ठरता ती कुतूहलाची ठरली तर खऱ्या अर्थाने ‘होबा’ होते!