विज्ञान-रंजन – सत्येंद्रनाथ!

>> विनायक

आज 1 जानेवारी 2024. जगभर जे कॅलेंडर सध्या प्रचलित आहे त्या वर्षाचा पहिला दिवस. खरं तर कधीतरी आपण विज्ञान सदरातून जागतिक व्यवहारातील या ‘कॅलेंडर’ची म्हणजे दिनदर्शिकेची माहिती घेतली आहे, तर नवं वर्ष सर्वांना सुखाचं ठरो अशी सदिच्छा व्यक्त करू या. आज ‘इंटरनेट’ किंवा ‘आंतरजाला’चा वाढदिवस असंही मानलं जातं. 1983 मध्ये याच दिवशी ‘नेट’ व्यवहार सुरू झाला आणि तो आता अक्षरशः विश्वव्यापी ठरला आहे. गेल्या चाळीस वर्षांत माहितीच्या या जागतिक संकलन, आदान-प्रदान यांनी पारंपरिक पत्रसंपर्काला पूर्णविरामच दिल्यागत वाटतं. ‘नेट’चा सर्रास वापर सर्वदूर पोहोचायला तसा काही काळ जावा लागला. आपल्या देशात ते 1986 मध्ये आलं, पण 15 ऑगस्ट 1995 पासून सर्वत्र पसरलं. आमच्या ‘खगोल मंडळ’ या विज्ञान संस्थेच्या स्थापना काळात म्हणजे 1985 मध्येही आमचा पत्रव्यवहार जुन्या पोस्टाच्या सेवेद्वारेच व्हायचा. पुढे ई-मेल आल्यावर क्षणात ‘पत्र’ जगाच्या कोणत्याही भागांत कॉम्प्युटरद्वारा पोहोचायला सुरुवात झाली आणि जुन्या टपाल सेवेला उगाचच ‘स्नेल-मेल’ म्हणजे ‘गोगलगायगती’ असलेली व्यवस्था असं म्हटलं जाऊ लागलं. वास्तविक ‘पोस्टा’ने काही शतकं जगावर राज्य केलं. आजही ते कार्य चालतंच, पण मर्यादित प्रमाणात. त्यावेळची हाती पत्र लिहिण्याची आपुलकीची भावना मात्र ई-पत्राने घालवलीच.

…पण आताचा विषय आहे तो 1 जानेवारी 1894 रोजी जन्मलेल्या आणि विख्यात भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्यासह ‘बोस आइन्स्टाइन कन्डेन्सेट’ ही पद्धती शोधण्याचा मान मिळवणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रज्ञाचा. 1974 पर्यंतचा 80 वर्षांच्या जीवनात सत्येंद्रनाथ बोस यांनी क्वान्टम मेकॅनिक्स (पुंजवाद), बोस आइन्स्टाइन स्टॅटिस्टिक्स अशा विविध विषयांवर संशोधन केलं. गणिती आणि भौतिकीतज्ञ असलेल्या सत्येंद्रनाथांनी जागतिक कीर्ती प्राप्त केली. लंडनच्या ‘रॉयल सोसायटी’ची फेलोशिप प्राप्त करणाऱ्या बोस यांना 1954 मध्ये पद्मविभूषण सन्मानही लाभला होता.

सत्येंद्रनाथ विलक्षण प्रतिभेचे प्रज्ञावंत संशोधक होते. गणित आणि भौतिकशास्त्राबरोबरच त्यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र, धातुशास्त्र या वैज्ञानिक शाखांमध्ये गती होती आणि त्याचबरोबर तत्त्वज्ञान आणि साहित्य यातही रस होता. ते खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.

कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणानंतर ते कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात दाखल झाले तेव्हा तिथे त्यांना प्रफुल्लचंद्र राय आणि वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांच्यासारखे दिग्गज मार्गदर्शक शिक्षक लाभले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण देशातच झाले. श्रेष्ठ वैज्ञानिक होण्याची क्षमता असलेल्या सत्येंद्रनाथांना बंगाली आणि इंग्लिश भाषांबरोबरच फ्रेंच, जर्मन आणि संस्कृत या भाषाही येत होत्या. कवी कालिदास आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्यांप्रमाणेच त्यांना लॉर्ड टेनिसन यांच्याही कवितांचा अभ्यास करावासा वाटला.

सत्येंद्रनाथांचे सहाध्यायीसुद्धा तोलामोलाचेच होते. सत्येंद्रनाथ परीक्षेत पहिले येत, तर नंतर वैज्ञानिकच झालेले मेघनाद साहा दुसऱ्या क्रमांकावर असत. असे गुरू आणि असे सहकारी लाभल्यावर प्रज्ञावंत माणसाला आणखी काय हवे.

कालांतराने ते तत्कालीन अखंड हिंदुस्थानातील आणि आज बांगलादेशाची राजधानी असलेल्या ढाका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. तिथे त्यांनी ‘प्लॅन्क’ यांच्या ‘क्वान्टम रेडिएशन लॉ’वर स्वतंत्र ‘पेपर’ लिहिला आणि थेट आइन्स्टाइन यांनाही पाठवला. त्या लेखाचं (पेपर)महत्त्व जाणून स्वतः आइन्स्टाइन यांनी तो जर्मन भाषेत रूपांतरीत केला. परिणामी बोस यांना युरोपिअन एक्स-रे क्रिस्टलॉग्राफी प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांच्या एक सहकारी होत्या प्रसिद्ध शास्त्र्ाज्ञ मेरी क्युरी.

विद्यार्थ्यांना प्रारणांवर शिकवताना सध्याची पद्धती (थिअरी) अपूर्ण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कारण प्रयोगातून अपेक्षित उत्तर मिळत नव्हतं. ‘प्लॅन्क्स लॉ’वर एक लेख आइन्स्टाइन यांना पाठवताना सत्येंद्रनाथांनी लिहिलं ‘सर तुम्हाला पत्र लिहिण्याचे धाडस करून माझा लेख पाठवत आहे. माझ्या म्हणण्यावर तुमचे मत मला अपेक्षित असून मला जर्मन भाषा नीट येत नसल्याने तुम्ही त्याचे भाषांतर करवून तो तिथल्या भौतिकी संस्थेला दिल्यास उत्तम. अर्थात तुम्हाला माझं म्हणणं योग्य वाटलं तरच. आपला परिचय नसतानाही ही विनंती करताना मला संकोच वाटत नाही याचे कारण म्हणजे आम्ही सर्व तुमचेच विद्यार्थी आहोत.’ आइन्स्टाइन यांना हा प्रांजलपणा आवडला. त्यांनी 1924 मध्ये बोस यांचा पेपर जर्मन भाषेत प्रसिद्ध केला. त्यातूनच पुढे बोस-आइन्स्टाइन स्टॅटिस्टिक्स उदयाला आले.

कालांतराने आइन्स्टाइन यांनी या कन्डेन्सेट थिअरीचा वापर अणुसंशोधनात केला आणि त्यातून भाकीत केलेल्या मूलकणाला ‘बॉसॉन’ असे नाव बोस यांच्या आडनावावरून मिळाले. नोबेल पुरस्कारासाठीही त्यांचं नामांकन झालं होतं ते 1956 मध्ये, परंतु ते त्यांना मिळालं नाही. केंद्र सरकारने मात्र त्यांचा यथोचित सन्मान करून 1994 मध्ये त्यांच्या फोटोसहित टपाल तिकीटही प्रसिद्ध केलं. हिग्ज यांनी अधिक संशोधन केलेल्या बॉसॉन मूलकणाचा शोध 2013 मध्ये ‘सर्न’ कोलायडर प्रयोगशाळेत लागला. त्यालाच हिग्ज-बॉसॉन मूलकण म्हणतात.