>> विनायक
भूकंपाचा थोडासा अभ्यास केला तरी भूकंपामागचं विज्ञान समजून कसं घेता येतं ते गेल्या वेळच्या लेखात वाचलं. अवकाशातील दूरस्थ दीर्घिकांपर्यंत जाणं जितकं अवघड, तितकंच कठीण पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत पोचणं. पृथ्वीचा व्यास (डायामीटर) आहे 12800 किलोमीटर, म्हणजे त्रिज्या (रेडिअस) 6400 किलोमीटर. एवढं अंतर तर भूपृष्ठावर आपण विविध वाहनांच्या सहाय्याने पार करतो, मग पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत जायला काय हरकत आहे? तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
आपण पृथ्वीच्या कवचावर (क्रस्ट) राहातो. तिथला काळा, ज्वालामुखीजन्य खडक आपल्याला अतिशय घट्ट आणि कठीण वाटतो. परंतु पृथ्वीच्या कवचापेक्षा, आतील भागातील घनता अधिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे पृथ्वीच्या गाभ्यात जसजसं जाऊ तसतसं लोहाचं प्रमाण प्रचंड वाढतं. लोहाचे अणु, हायड्रोजनच्या अणुपेक्षा 55 पट घनतेचे असतात. पृथ्वीच्या संरचनेत गाभ्याचा सर्वात आतला भाग घट्ट लोखंडाचा असून त्याभोवती द्रवरूप लोहाचाच थर आहे. त्यावर मॅन्टलचा (आवरणाचा) भाग असून त्यावर आपण राहतो तो पृष्ठभाग आहे. मात्र तोसुद्धा लाव्हारसावर तरंगणाऱ्या 7 मुख्य आणि 8 छोटय़ा अशा टॅक्टॉनिक प्लेटस्वर आहे. मोठय़ा प्लेट्स पृथ्वीकवचाचा 94 टक्के तर लहान प्लेट्स 6 टक्के भाग व्यापतात. आपला देश छोटय़ा प्लेट किंवा प्रस्तरावर वसला आहे.
भूकंपाच्या वेळी या प्लेट्सची वेगाने हालचाल होते. लाव्हा रसावर तरंगत असल्याने या प्लेट्स सतत कंपनं निर्माण करतच असतात. परंतु त्याची तीव्रता कमी असल्याने त्यामुळे उत्पात घडत नाहीत. म्हणूनच रोजचे हजारो भूकंप आपण ‘पचवू’ शकतो. भूकंपमापन यंत्रावर याची नोंद होते. या सगळय़ाची माहिती मागच्याच लेखात सविस्तर घेतली.
आता प्रश्न असा येतो की, अशा अकल्पित आणि आकस्मिक भूकंपांची वेळ आली तर काय करायचं किंवा आधीपासूनच कोणती काळजी घ्यायची? परंपरेने जी भूकंप क्षेत्रे ठाऊक आहेत तिथ लाकडी घरांचं बांधकाम केलं जातं. त्यामुळे जीवितहानी कमी होते. काही वर्षांपूर्वी उत्तराखंडात भूकंप झाला किंवा जमीन खचण्याचे अथवा भूस्खलनाचे प्रकार घडले तेव्हा आधुनिक बांधणीच्या घरांच्या तुलनेत प्राचीन पद्धतीच्या लाकडी घरांनीच तग धरला.
हिमालयाची निर्मिती उपखंडाची प्लेट वरच्या आशियाई प्लेटला धडकल्यामुळे झाली आहे. तिथली जमीन ठिसूळ असून तिथे उंच कॉन्क्रीटच्या इमारतींसाठी खोल पाया घालण्याला लागणारा काळा पत्थर सलग सापडणं कठीण. तशीच काहीशी परिस्थिती नेपाळ या हिमालयातील देशाचीही आहे. तिथेही काही वर्षांपूर्वी भयावह भूकंप झाला होता. त्या भागात पारंपरिक घरं लाकडाचीच असतात. पूर्वी एक किंवा दोन मजली घरंच सर्व जगभर असायची. राजप्रासाद थोडे उंच असत. परंतु सामान्य माणसे बैठय़ा घरातच राहात. कृषी संस्कृती सर्वत्र असल्याने ते जीवनशैलीशी सुसंगत होतं.
औद्योगिक क्रांतीनंतर युरोप-अमेरिकेत आवाढव्य इमारती उभ्या राहिल्या. न्यूयॉर्कच्या ‘एम्पायर स्टेट’ इमारतीने तर अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. या 102 मजली इमारतीचे आणि त्यावरून सभोवतालच्या परिसराचे दर्शन घेण्यासाठी जगभरचे पर्यटक आसुसले. आता तो मान दुबईच्या बुर्ज खलिफा इमारतीकडे असेल. त्याहून उंच टॉवर असतीलही, पण राहती घरं असणाऱ्या शंभर मजली इमारती अभावानेच आढळतात. तरीही मुंबईसारख्या शहरात 50-60 किंवा त्याहून जास्त मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या जपानमधेही अशा गगनस्पर्शी इमारती आहेत हे विशेष. मात्र त्याची अंतर्बाह्य रचना काहीशी वेगळी असते. वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने घरातले सामान किंवा उंच इमारतही पडणार नाही याची दक्षता घेऊनच बांधकाम होते. त्यात लाकडाचा अधिक वापर तर असतोच, पण पाया घालताना त्यात लवचिक (फ्लेक्झिबल) स्टील, भक्कम रबर आणि शिशाच्या प्लेटस्चाही वापर केला जातो. त्यामुळे भूकंप झाल्यावर ती कंपनं पायामधील या गोष्टी शोषून घेतात आणि इमारत कमी हादरते.
माडाच्या झाडाला जशी ‘स्प्रिंग अॅक्शन’ असते असाच काहीसा हा प्रकार. माडाचे वलयांकित खोड उंच वाढले तरी वाऱ्या-वादळात वाकते, पण पुन्हा उभे राहाते. फुकुशिया येथे उद्भवलेल्या त्सुनामीमुळे आलेल्या 9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने तो थरारक अनुभव सांगताना म्हटलं होतं की, ‘उंच इमारती ‘झुलताना’ दिसत होत्या. पण पडझड फारच कमी झाली.’ अशीच ‘पायाभूत’ काळजी घेऊन जपानमध्ये बुलेट ट्रेनही वेगात धावतात. आधुनिक तंत्रज्ञानाने भूकंपप्रवण क्षेत्रात घरं बांधण्याची बऱ्यापैकी सुरक्षित पद्धत विकसित केली असून त्याबाबतचे विविध प्रयोग सुरूच आहेत.
मात्र त्सुनामी येते तेव्हा सागरतळाशी भूकंप होऊन भीषण लाटा उसळतात. त्यातच भूकंप झाला तर अनावस्था निर्माण होते. जपानने 11 मार्च 2011 रोजी सर्वच गोष्टींचा एकत्रित अनुभव घेतला. फुकुशिमा अणुभट्टीत पाणी शिरून ती निकामी झाली. रेडिएशनचा धोका निर्माण झाला. मात्र भूकंपाने फारशी हानी झाली नाही, ती भूकंपरोधक बांधकामामुळे.