विज्ञान -रंजन : ‘पिसा’चा कलता मनोरा!

>> विनायक

देखणी  रचना, उत्तम बांधकाम आणि तिरपेपणाचं वैशिष्टय़ बाळगून इटलीमधल्या पिसा (किंवा पिझा) शहरातील एक वर्तुळाकार मनोरा जगाचं लक्ष वेधून घेतोय त्या गोष्टीला आता 652 वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आपलं तिरपं किंवा तिरकं अस्तित्व हे वैगुण्य न समजता अभिमानाने मिरवत इसवी सन 1372 पासून पिसा येथील हे कॅथिड्रल किंवा प्रार्थनास्थळाचं घंटाघर म्हणजे ‘बेल-टॉवर’ दिमाखात उभं आहे.

विशेष म्हणजे हा मनोरा पायापासून वरपर्यंत पाहिला तर एका बाजूला चांगला दोन-अडीच फुटांनी कललेला आहे. त्याची एका बाजूची उंची 183 फूट 3 इंच, तर दुसऱ्या बाजूची 185 फूट 11 इंच आहे. आधी म्हटल्याप्रमाणे तब्बल 652 वर्षे वाऱ्यावादळांना आणि कोटय़वधी पर्यटकांच्या वर्दळीला सहन करत ‘पिसा’चा हा एका बाजूला झुकलेला मनोरा नव्या पिढय़ांचं लक्ष वेधून घेतोय.

296 पायऱ्या असलेल्या 14500 टन वजनाच्या मनोऱ्याचं बांधकाम सुरू झालं ते बाराव्या शतकात. बांधकाम सुरू होताच लक्षात आलं की, ज्या भूभागावर हा मनोरा उभा करायचा ती जागा मऊ मातीची आहे. त्यामुळे मनोऱ्याचं वजन या जागेला पेलणार नाही. तरीही इमारतीच्या ‘गुरुत्वमध्या’ची काळजी घेत मनोऱ्याची रचना सुरूच राहिली. अखेरीस 1372 मध्ये हे काम पूर्ण होऊन कललेला असला तरी पडणार नाही असं स्पष्ट करत हा ‘बेल-टॉवर’ सर्वांसाठी खुला करण्यात आला.

सुरुवातीला बेताचा ‘कल’ किंवा तिरकेपणा असलेला हा सुंदर मनोरा 1990 पर्यंत चांगला साडेपाच अंश कलला! आता या ‘बेल-टॉवर’ची घंटा त्याच्या अस्तित्वाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देऊ लागली. मग तातडीने एका बाजूला शिशाचे जाड ठोकळे रचून 1993 ते 2001 या काळात मनोऱ्याचा कल 3.97 इतका करण्यात यश आलं. मूळ इमारतीला कुठेही तडा न जाता असं संपूर्ण बांधकाम ‘सरळ’ करण्याचा प्रयत्न करणं ही सोपी गोष्ट नव्हती.

बरं, तो पूर्णपणे सरळ एका रेषेत उभा करायचा नव्हताच! कारण शतकानुशतकं त्याचं तिरपं असणं हाच त्याचा मोठा ‘गुण’ ठरला होता. एरवी जगात स्थापत्याच्या दृष्टीने अप्रतिम असलेल्या अनेक इमारती आहेतच. ‘कल’ नसेल तर ‘पिसा’च्या या ‘लिनिंग’ म्हणजे कलत्या टॉवरचं वैशिष्टय़ंच संपलं असतं. तेव्हा मनोरा तिरका तर ठेवायचा, पण पडू द्यायचा नाही ही स्थापत्यविशारदांची परीक्षाच होती. त्यात ते पास  झाले आणि मनोरा धोकादायक कलण्यापासून वाचला.

12 व्या शतकातील इटलीमधल्या अनेक प्रसिद्ध इमारतींचे रचनाकार होते गुग्लीएल्मो आणि पिझानो. त्यांनी या मनोऱ्याच्या स्थापत्यशास्त्राचा आराखडा बनवला. उत्तम शिल्पकला, प्रचंड आकाराची घंटा आणि सातव्या मजल्याच्या एका बाजूला कमी-अधिक उंचीमुळे दोन पायऱ्या कमी-जास्त असणारी ही विलक्षण रचना तयार झाल्यापासूनच ‘पडेल की काय’ अशा धास्तीने उभी आहे. 27 फेब्रुवारी 1964 रोजी तर हा टॉवर इतका कलला की, आता त्याचा गुरुत्वमध्य ढासळून तो कोसळणार याची भीती इटलीच्या सरकारला वाटू लागली. मग काही काळ तो पर्यटकांसाठी बंद ठेवून त्याच्या एका बाजूला 870 टन वजनाचे शिशाचे ठोकळे रचण्यात आले. तळाची जमीन मऊ असल्याने त्याचा फायदा होऊन ‘कल’ थोडा सुधारला. मनोऱ्याच्या ‘कल’ वाढू लागल्यावर वजन कमी करण्यासाठी या बेल टॉवरमध्ये असलेल्या वजनदार घंटा तात्पुरत्या काढून ठेवण्यात आल्या.

त्याशिवाय मनोऱ्याच्या तिसऱ्या मजल्याभोवती पोलादी तारांचं वेटोळं करून तो एक बाजूने खेचून घेतला जावा म्हणून केबल ताणून दूरवर रोवण्यात आल्या. आसपासच्या इमारतीमधल्या रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलं. मनोऱ्याच्या उंचवटय़ाच्या तळाची 38 क्युबिक मीटर माती काढण्यात आली आणि त्याला कलत्याच, पण न पडणाऱ्या ‘लेव्हल’पर्यंत आणण्यात एकदाचं यश आलं. आता हा मनोरा पुढची 300 वर्षे आहे तसाच राहील असा विश्वास निर्माण झाल्यावर 15 डिसेंबर 2001 रोजी तो पर्यटकांसाठी पुन्हा उपलब्ध झाला. मनोऱ्याच्या शिल्पकलेचं शतकांच्या हवामानाने झालेलं नुकसान, प्रदूषणाने काळवंडलेला भाग याच्या दुरुस्तीचं आणि साफसफाईचं काम सतत सुरू ठेवावं लागतं. 9 ऑगस्ट 2023 रोजी या मनोऱ्याचा 850 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 1280 ते 2018 या काळात चार मोठे भूकंप ‘पचवून’ ‘सॉफ्ट सॉइल’वर उभा असलेला पिसाचा कलता मनोरा आपल्या 8 गोलाकार मजल्यांसह ‘तिरक्या’ नजरेने जग न्याहाळत आहे आणि त्याचं ‘दर्शन’ घ्यायला दरवर्षी 50 लाख पर्यटक येत आहेत. त्यातून इटली सरकारला 20 लाख ‘यूरो’ एवढं उत्पन्न मिळतं.

विज्ञानरंजनाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅलिलिओ यांनी याच मनोऱ्यावरून दोन भिन्न वजनांच्या वस्तू खाली सोडून वजन (वस्तुमान) वेगळं असलं तरी त्या एकाच वेगाने खाली पडतात हे 1654 मध्ये सिद्ध केलं होतं. मात्र त्यांचा हा ‘फ्री फॉल’ सिद्धांत 1717 मध्ये प्रसिद्ध झाला.